News

शिवसेना नसती तर भाजपला जेमतेम ४०-५० जागा मिळाल्या असत्या

मुंबई: ‘२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे जे १०५ आमदार निवडून आले त्यात शिवसेनेचा मोठा वाटा होता. शिवसेना नसती तर भाजपचे अवघे ४० ते ५० आमदार निवडून आले असते,’ असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.

शिवसेनेचं मुखपत्र दैनिक ‘सामना’साठी शरद पवार यांनी मॅरेथॉन मुलाखत दिली आहे. शिवसेनेचे खासदार व सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रसिद्ध झाला. त्यात पवार यांनी लॉकडाऊन, आघाडी सरकारचा रिमोट कंट्रोलपासून ते शिवसेना-भाजप युती बाबतच्या अनेक प्रश्नांना मनमोकळी उत्तरं दिली आहेत.

१०५ आमदारांचं बळ असताना आणि राज्यात सर्वात मोठा पक्ष असतानाही भाजप सत्ता स्थापन करू शकला नाही. हा काय चमत्कार होता, असा प्रश्न पवारांना विचारण्यात आला. त्यावर पवारांनी सविस्तर उत्तर दिलं. ते म्हणाले, ‘भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रात प्रमुख पक्ष कसा बनला याच्याही खोलात जायला पाहिजे. विधानसभेला भाजपचे जे १०५ आमदार निवडून आले त्यात शिवसेनेचं योगदान फार मोठं होतं. शिवसेना भाजपसोबत नसती तर १०५ चा आकडा ४०-५० च्या आसपास दिसला असता,’ असं पवार ठामपणे म्हणाले.

‘भाजपचे लोक आता सांगतात की १०५ आमदार असतानाही शिवसेनेनं आम्हाला दुर्लक्षित केलं किंवा सत्तेपासून दूर ठेवलं. पण भाजपला १०५ पर्यंत पोहोचवण्याचं काम शिवसेनेनंच केलं होतं. त्यांनाच गृहीत धरण्याची भूमिका भाजपनं घेतली. मागच्या पाच वर्षात भाजपनं शिवसेनेला जवळपास बाजूला सारलं होतं. शिवसेनेला गप्प कसं करता येईल हेच पाहिलं गेलं. त्यामुळं भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी इतरांनी वेगळं काही करण्याची आवश्यकताच नव्हती,’ असा टोलाही पवारांनी हाणला.