बीड

पुण्यात धान्यखरेदीसाठी मोठी रांग, 5 दिवस केवळ ‘ही’ दुकाने राहणार सुरू

पुणे, 11 जुलै : पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांमध्ये मोठी वाढ होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या आढावा बैठकीनंतर उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यासह पिंपरी चिंचवड शहरात लॉकडाऊनची घोषणा केली. तसंच नागरिकांनी पुढील काही दिवसांसाठी लागणाऱ्या अत्यावश्यक गोष्टी खरेदी करून ठेवाव्यात, असं आवाहनही केलं.

प्रशासनाच्या आवाहनानंतर वीकेंडला पुणेकरांनी किराणा खरेदीस रांगा लावायला सुरुवात केली आहे. काल मद्यप्रेमींनी वाईन शॉपबाहेर रांगा लावल्यानंतर आज धान्य खरेदी साठी नागरिक रांगेत उभे आहेत. सोमवार13 जुलैला मध्यरात्रीपासून 18 जुलै रात्रीपर्यंत असा 5 दिवस पुण्यात कडक लॉकडाऊन असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी गैरसोय होऊ नये म्हणून आज खरेदीसाठी प्राधान्य दिलं आहे.

पुण्यात 13 जुलैपासून पुढील 5 दिवस केवळ दवाखाने,दूध आणि औषधाची दुकाने खुली असणार आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हे कठोर पाऊल प्रशासनाकडून उचलण्यात आलं आहे. त्यामुळे लॉकडाऊनचे नियम काटेकोरपणे पाळण्याची जबाबदारी आता पुणेकरांवर असणार आहे.

दरम्यान, ‘पुणे शहरात अत्यंत कडक लॉकडाऊन करण्यात येत आहे. 13 जुलै म्हणजे सोमवारी मध्यरात्रीपासून लॉकडाऊनची अंमलबजावणी होईल. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. यामध्ये दूध,औषध यांचा समावेश आहे. ज्या वस्तू लागत आहेत, त्या खरेदी करुन घ्या,’ असं आवाहन विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांच्याकडून करण्यात आलं आहे.

पुणे शहरात तर कडक लॉकडाऊन असेल, तर जिल्ह्यातील संक्रमण असलेल्या भागातही लॉकडाऊन असणार आहे. त्यामुळे नागरिकांना आता पुन्हा एकदा शिस्त दाखवत अत्यावश्यक काम नसेल तर घरातच थांबावं लागणार आहे. अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागेल.