News

सरकारचा धाडसी निर्णय! पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा लॉकडाऊन

पुणे:  करोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यातील कंटेनमेंट झोनमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तसे आदेश दिले आहेत. त्यानुसार १३ जुलैपासून १५ दिवस पुणे बंद राहणार आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागांमध्ये प्रतिबंधित क्षेत्र वगळता अन्य ठिकाणी लॉकडाऊनमध्ये शिथिलता कायम असणार आहे.

सुमारे ७२ दिवसांच्या लॉकडाऊननंतर राज्य सरकारनं जूनच्या सुरुवातीपासून अनलॉकला सुरुवात केली होती. तेव्हापासून सार्वजनिक वाहतूक वगळता सर्व व्यवहार टप्प्याटप्प्यानं पूर्ववत केले जात आहेत. मात्र, लॉकडाऊन जसजसे शिथिल होत आहे, तसतसे करोनाचे रुग्ण वाढत असल्याचं निदर्शनास येत आहे. पुणे जिल्ह्यातही रुग्ण वाढीचं प्रमाण मोठं आहे. नागरिकांची बेफिकीरी देखील यास कारणीभूत ठरली आहे. नागरिकांनी शिस्त न पाळल्यास पुन्हा लॉकडाऊन घेण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी याआधी वेळोवेळी दिला होता. त्यानंतरही लोकांचं विनाकारण फिरणं थांबलं नाही. त्यातून संसर्गाचा धोका वाढला. तो आणखी वाढू नये म्हणून अखेर सोमवारी मध्यरात्रीपासून पुन्हा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी यासंदर्भात चर्चा झाली आहे. त्यांनीदेखील पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा लॉकडाउन लागू करण्यास सहमती दर्शवली आहे. करोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्याची सध्याची यंत्रणा कायम राहणार आहे. रुग्णांवर उपचार करण्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली आहे.

कारवाईचा धडाका

लॉकडाऊन सुरू होण्याआधीच पुणे पोलिसांनी कंटेनमेंट झोनमध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा धडाका लावला आहे. विनापरवानगी संचार, मास्क न वापरणे, वाहनांवरुन संचार, पदपथावरुण वाहन चालवणे आदी कारणांसाठी ही कारवाई करण्यात आली आहे. शहरातील कंटेनमेंट झोनमध्ये बंदोबस्तासाठी २७८ अधिकारी आणि ११९६ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

रुग्णसंख्या ३५ हजारच्या उंबरठ्यावर

मुंबईनंतर सर्वाधिक करोनाबाधित जिल्हा म्हणून महाराष्ट्रात पुण्याचा क्रमांक आहे. सुरुवातीच्या काळात करोनाची लागण पुणे शहर व पिंपरी-चिंचवड पुरता मर्यादित होती. मात्र, लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर ग्रामीण भागातही लागण सुरू झाली. जिल्ह्यातील रुग्णसंख्या ३५ हजारच्या उंबरठ्यावर आहे. आतापर्यंत ३४ हजार ५८२ जणांना करोनाची लागण झाली आहे. तर, ९७९ जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे शहरातील रुग्णसंख्येनं १५ हजारचा टप्पा ओलांडला आहे.