News

औरंगाबादमध्ये सबकुछ बंद; कडक संचारबंदी सुरू; नाक्यानाक्यावर पोलिसांची गस्त

औरंगाबाद: गेल्या पंधरा दिवसांत शहर व लगतच्या नागरी वसाहतीत करोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने शुक्रवारपासून १८ जुलैपर्यंत संचारबंदी जाहीर केली आहे. प्रशासनाने सुरवातीलाच यावेळची संचारबंदी कडक असणार असल्याचे सूतोवाच केले होते. त्याची प्रचिती आज पहिल्याच दिवशी आली.

करोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने शहरात संचारबंदी जाहीर केली. सकाळी सहा ते आठ या वेळेत दूध विक्री तसेच वर्तमानपत्र विक्रेत्यांना परवानगी होती. शहरवासीयांनी त्याचे पालन केले. काही चौकांमध्ये खरेदीसाठी थोडी गर्दी दिसून आली. सकाळी ८ नंतर शहरातील रस्त्यांचा ताबा पोलिसांनी घेतला.चौका- चौकात पोलिसांचे तपासणी पथक आणि बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेसाठी पोलिस प्रशासनाने दिलेल्या पासची तपासणी सुद्धा चौकाचौकात केली गेली. सूतगिरणी चौक, टीव्ही सेंटर चौक, क्रांतीचौक, औरंगपुरा, रेल्वेस्टेशन, सिडको बसस्टँड चौकात दुचाकी, चारचाकीत येणाऱ्यांची कडक तपासणी केली गेली. पास नसलेल्यांना परत पाठविण्यात आले. सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांचीही ओळख पटल्यानंतर त्यांना पुढे जाण्यास परवानगी दिली गेली. मोंढा आणि बाजार समितीमुळे पहाटेच गर्दी असलेला जळगाव टी पॉईंट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर चौक मात्र संचारबंदीमुळे कडकडीत बंद होता. पहाटेपासून गर्दी असलेला ताज हॉटेल कॉर्नर , हर्सूल कारागृह परिसरात पोलीस गस्त सुरु झाली असून दूधविक्रीच्या दुकानांना सकाळी ८ वाजेपूर्वी बंद करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाकडून देण्यात येत होत्या.

सकाळी पहिल्या टप्प्यात पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी शहरात फिरुन परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दुपारी क्रांतीचौकात जाऊन परिस्थिती जाणून घेतली. दुपारच्या सुमारास सचखंड एक्स्प्रेस आली. उतरलेल्या ५५ प्रवाशांची रेल्वेस्टेशनमध्येच तपासणी करण्यात आली. शहराबाहेरील दौलताबाद, झाल्टा, केंब्रिज, सावंगी चेकपोस्टवरुन शहरात येण्या जाण्यास मज्जाव करण्यात आला. शहरातील पेट्रोलपंप बंद ठेवण्यात आले आहे. केवळ कंपनीच्या पंपांना ठराविक कालावधीपर्यंत मुदत होती. पेट्रोलपंप बंद असल्याने अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या काहींना त्रास झाला. जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शुकशुकाट होता. एरव्ही पहाटे तीनपासून या बाजारपेठेत भाजी, अन्नधान्याची आवक होत असते. चेकपोस्टवर महापालिकेकडून अँटीजन टेस्ट करण्यात येत आहे. सकाळपासून १५ जणांच्या तपासणीतून दोन करोनाबाधित असल्याचे आढळून आले. शहरातील रस्त निर्मनुष्य होते. सकाळपासूनच ढगाळ वातावरण, त्यास शांत शहर असे काहीसे चित्र शहरात आहे.