News

कोरोनाबाधित महिला रुग्णालयातून पळाली…हातात रॉड घेऊन कर्मचाऱ्यांवर दगडफेक

मावळ, 9 जुलै : राज्यभरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना काही रुग्णांकडून मात्र संतापजनक कृत्य घडत असल्याचा घटना समोर येत आहेत. उपचारासाठी दाखल कोरोनाबाधित महिलेने रुग्णालयातून पलायन केल्याची घटना तळेगाव येथील मायमर रुग्णालयात घडली आहे.

कर्मचाऱ्यांची नजर चुकवून 45 वर्षीय कोरोनाबाधित महिलेने सुरक्षा भिंतीवरुन उडी मारुन पलायन केले होते. ही घटना बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली होती. सुमारे दीड तासाच्या शोध मोहिमेनंतर त्या महिलेला पुन्हा ताब्यात घेण्यात आले.

बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत ती महिला लपून बसली होती. हातात लोखंडी गज आणि वीट घेतली होती. ती दगड फेकून मारत असल्याने तिला पकडण्यासाठी जवळ जाणेही कठीण झाले होते. त्या रुग्ण महिलेला बोलण्यात गुंतवून पीपीई किट घातलेल्या चार कर्मचाऱ्यांनी मागील बाजूने इमारतीत प्रवेश करून तिला पकडले आणि रुग्णवाहिकेत घालू पुन्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. ही महिला कामशेतची रहिवासी असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

बार्शी तालुक्यातही 4 जण पळाले

बार्शी तालुक्यातील गाडेगाव रोडवरील क्वारन्टइन सेंटरमधील चार रुग्ण पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

गाडेगाव रोडवरील मुलींच्या वसतिगृहात कोव्हिड सेंटरमधील रुग्णांची तपासणी सुरू असताना क्वारन्टाइन केलेले चार जण पळून गेले आहेत. हे चारही जण हायरिस्क रुग्ण असल्याची माहिती आहे. त्यामुळे बार्शीकरांची चिंता वाढली आहे. याबाबत या चौघांविरुध्द कोविड 19 चा संसर्ग पसरविण्याचे घातक कृत्य केल्याने बार्शी शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.