News

मुंबईत हायअलर्ट!

मुंबई, 9 जुलै: मुंबईसह संपूर्ण देशात मान्सून (Monsoon) पूर्णपणे सक्रिय झाला आहे. मुंबईत गुरुवारी पुन्हा एकदा हाय टाईडचा (high tide)इशारा देण्यात आला आहे. दुपारी 3 वाजेच्या सुमारास समुद्रात 4.26 मीटर उंच लाटा उसळण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. याकाळात मुंबईकरांनी समुद्र किनाऱ्यापाशी जाऊ नये, असं आवाहन बीएमसीतर्फे करण्यात आलं आहे.

मुंबईसह ठाणे आणि कोकणात गेल्या काही दिवसांपासून दमदार पाऊस होत आहे. त्यामुळे सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

मुंबईसह उपनगरात तसेच ठाणे, कल्याण-डोंबिवली, कोकण, तळकोकण भागात गेल्या काही दिवसांपासून पावसानं चांगलाच जोर पकडला आहे. पुढील 48 तास सुद्धा हीच परिस्थिती कायम राहील असे अंदाज हवामान खात्याने वर्तवले आहेत.

दुसरीकडे, गुजरातमधील सौराष्ट्र-कच्छमध्येही मुसळधार पाऊस सुरू आहे. त्याच बरोबर देशाच्या पूर्व आणि पश्चिमी भागात मुसळधार पाऊस सुरू आहे.

मुंबईत मुसळधार..

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत मुंबईसह उपनगरात 58.3 मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद सांताक्रुज वेधशाळेत करण्यात आली आहे. तर दक्षिण मुबंईतील कोलाबा वेधशाळेत 58 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

गुजरातमध्येहा मुसळधार…

गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छ भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे आतापर्यंत 1162 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. या भागात सलग चौथ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. जामनगरमध्ये सखल भागात पाणी साचलं आहे. अनेक घरामध्ये पाणी शिरलं आहे.

भूस्खलनाचा इशारा..

हिमाचल प्रदेशात बहुतांश भागात पावसाची जोरदार बॅटींग सुरू आहे. परिणामी शिमला, सोलन तसेच परिसरात भूस्खलन होऊ शकतं, अशा इशारा हवामान विभागानं जारी केला आहे.

दिल्लीतही पाऊस..

भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) अंदाजानुसार, देशाची राजधानी दिल्लीत पुढील दोन दिवसात मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.