24 तासांत सापडले तब्बल 61 हजार रुग्ण, तरी ‘या’ देशात सुरू होणार शाळा
वॉशिंग्टन, 09 जुलै : जगभरात सध्या एक कोटी 21 लाख 55 हजारहून अधिक कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्ण आहेत. तर 5 लाख 51 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. यात अमेरिकेत सर्वात जास्त रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत अमेरिकेत तब्बल 61 हजार नवीन कोरोना रुग्ण सापडले. यासह अमेरिकेतील कोरोनाबाधितांची संख्या आता 30 लाख झाली आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठानं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही आठवड्यापासून 35 राज्यांत सर्वात जास्त कोरोना रुग्ण सापडले आहेत. या सगळ्या परिस्थितीतही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी शाळा लवकर सुरू करण्याबाबत शाळांना सांगितले आहे.
देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना, व्हाइट हाऊस देशातील शाळा पुन्हा सुरू करण्याच्या उद्देशाने जोर देत आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी सांगितले की जर त्यांनी शाळा सुरू केल्या नाहीत तर त्यांचा निधी कमी केला जाईल.
तर उपराष्ट्रपती माईक पेन्स यांनी सांगितले की, शाळा सुरक्षितपणे पुन्हा उघडू शकू. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या म्हणण्यानुसार अमेरिकेत कोरोना संक्रमणाची संख्या 30 लाखांच्या पुढे गेली आहे. त्याचबरोबर एक लाख 31 हजार मृत्यूची नोंद झाली आहे.
देशात रेकॉर्ड ब्रेक रुग्णांची नोंद तरी ट्रम्प हट्टावर कायम
बुधवारी, कॅलिफोर्निया आणि टेक्सासमध्ये 24 तासांत 10 हजाराहून अधिक रुग्ण आढळले आहेत, ही विक्रमी वाढ आहे. कोरोनाबाधितांची संख्या सतत वाढत असली तरी व्हाईट हाऊस शाळा सुरू करण्याच्या हट्टावर कायम आहे. व्हाईट हाऊसमधील कोरोना व्हायरस टास्क फोर्सचे प्रमुख असलेले अमेरिकेचे उपराष्ट्रपती माईक पेन्स म्हणाले की, नियम ‘फार कठोर’ नसावेत. ते म्हणाले की प्रकरणे कमी होत आहेत. दुसरीकडे, कोरोनाबाबत व्हाईट हाऊस सल्लागार आणि संसर्गजन्य रोग तज्ज्ञ अँथनी फोसी यांनी सांगितले की, कोरोनाच्या पहिल्या टप्प्यातच देशाने गुडघे टेकले होते.
शाळांवर टाकला जात आहे दबाव
कोरोनाचा कहर असूनही अमेरिकेत शाळा पुन्हा सुरू करण्याच्या आदेशावरुन सोशल मीडियावरही टीका होत आहे. ट्रम्प यांनी बुधवारी शाळांना इशारा देताना सांगितले की जर शाळा पुन्हा सुरू न झाल्यास हा निधी रोखला जाईल. ट्रम्प शाळांवर दबाव आणत आहेत, त्यामुळं त्यांच्यावर टीका केली जात आहे.
उपराष्ट्रपती माईक पेन्स यांनी जाहीर केले आहे की शाळांशी संबंधित काही नवीन ऑर्डरदेखील देण्यात येणार आहेत. अमेरिकेच्या अध्यक्षांनी प्रांतावर आणि स्थानिक अधिकाऱ्यांवर दबाव वाढवला आहे, असे असूनही न्यूयॉर्क सिटीने असे जाहीर केले की त्याचे बहुतेक विद्यार्थी आठवड्यातून फक्त दोन किंवा तीन दिवस वर्गात परत येतील आणि त्या दरम्यान ऑनलाइन वर्ग घेतील.