कानपूर एन्काउंटरमधील मुख्य आरोपी विकास दुबे याला अटक
उज्जैन:- कानपूरच्या बिकरू गावात ८ पोलिसांची हत्या केल्यानंतर गेल्या पाच दिवसांपासून फरारी असलेला कुख्यात गँगस्टर विकास दुबे याला अखेर अटक (Vikas Dubey arrested) करण्यात आली आहे. उज्जैनमधील महाकाल मंदिरातून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. मंदिराच्या सुरक्षा यंत्रणेने त्याला ताब्यात घेतले आहे.
उज्जैन येथून आज अटक केली. विकास दुबेने महाकालेश्वर मंदिरात पावती फाडली आणि त्यानंतर स्वतः शरण आला, असे सांगण्यात येत आहे. सध्या स्थानिक पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी विकास दुबेच्या अटकेला दुजोरा दिला आहे.
विकास दुबेने आपण शरण येत असल्याचं आधीच स्थानिक प्रसारमाध्यमांना कळवलं होतं. त्यानंतर तेथील स्थानिक पोलिसांसमोर शरण आला, अशी माहिती समोर येत आहे. पोलिसांनी तातडीने दुबेला अटक केली. त्यानंतर महाकाल पोलीस ठाण्यात घेऊन आले. विकास दुबे शरण आल्यानंतर एसटीएफचे पथक तातडीने उज्जैनकडे रवाना झाले आहेत. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनीही विकास दुबेच्या अटकेला दुजोरा दिला आहे. दुबे हा सध्या मध्य प्रदेश पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याला अटक कशी झाली याबाबत सध्या तरी बोलणे योग्य नाही. मंदिरात की मंदिराच्या बाहेर अटक झाली याबाबत सध्या काही सांगू शकत नाही. त्याने क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडल्या होत्या. पोलिसांच्या हत्येच्या घटनेनंतर आम्ही पोलिसांना सतर्क केले होते, अशी माहिती त्यांनी दिली.
कोण आहे विकास दुबे?
२००० साली कानपूरच्या शिवली ठाण्याच्या हद्दीतील ताराचंद इंटर कॉलेजचे सहायक व्यवस्थापक सिद्धेश्वर पांडेय यांच्या हत्याप्रकरणातही विकास दुबेचं नाव समोर आलं होतं. याच वर्षी त्याच्यावर रामबाबू यादवच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप झाला होता. हा कट त्याने तुरुंगात बसून रचला होता. २००४ मध्ये एका केबल व्यावसायिकाचीही हत्या झाली होती. त्यातही याचं नाव समोर आले होते. २०१३ मध्येही अनेक घटनांमध्ये विकास दुबे याचे नाव समोर आले होते. २०१८ मध्ये तुरुंगात असूनही त्याने चुलत भाऊ अनुराग याच्यावर हल्ला घडवून आणला होता. अनुरागच्या पत्नीने विकाससह चार जणांविरोधात तक्रार दाखल केली होती. विकास दुबेविरोधात तब्बल ६० गंभीर गुन्हे दाखल आहेत.