लातूरमध्ये लिंबू आणि कुंकूचा प्रसाद खाल्ला; २० जणांना करोना
लातूर: लातूरमध्ये अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका भोंदूबाबाने दिलेला लिंबू आणि कुंकूचा प्रसाद खाल्ल्याने तब्बल २० जणांना करोनाची लागण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या घटनेमुळे लातूरमध्ये खळबळ उडाली असून या भोंदूबाबावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
औसा तालुक्यातील सारोळा गावात हा धक्कादायक प्रकार घडला. देवीची परडी भरण्याच्या कार्यक्रमासाठी गावातील काही लोक एका आराद्याकडे गेले होते. हा आरादी गावचाच रहिवासी आहे. हा आरादी गावातील एका करोनाबाधिताच्या संपर्कात आला होता. त्याने सकून पाहून लिंबू आणि कुंकवावर फुंकर मारून हा प्रसाद गावातील अनेकांना खायला दिला. त्यामुळे अनेकांनी हा प्रसाद खाल्ला होता. दोन दिवसानंतर आजारी पडलेल्या या आराद्याचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्यांची करोना चाचणी करण्यात आली असता २० जणांना करोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे हे २०ही लोक तीन कुटुंबातील असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
या घटनेची माहिती मिळताच सारोळा गावात एकच खळबळ उडाली असून गावच्या पोलीस पाटलाने आराद्याविरोधात औसा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. या आराद्याविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे. तसेच या घटनेनंतर या २० करोनाबाधितांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. तसेच हे २० जण गावातील कुणाकुणाच्या संपर्कात आले होते, याचा शोध घेण्यात येत आहे.
दरम्यान, लातूरमधील करोना रुग्णांची संख्या ४९३वर गेली आहे. त्यापैकी २५२ जण करोनातून मुक्त झाले असून२१४ जणांवर उपचार सुरू आहेत. लातूर जिल्ह्यात आतापर्यंत करोनाने २७ जण दगावले आहेत. तर राज्यात मंगळवारी २२४ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यात मुंबईतील ६४ आणि पुण्यातील २७ रुग्णांचा समावेश आहे. त्याशिवाय ठाणे महापालिका आणि कल्याण-डोंबिवली प्रत्येकी १३, मीरा भाईंदर ११, पनवेल महापालिका ०९, वसई विरार ०८, ठाणे ०७, उल्हासनगर ०५, भिवंडी ०३, नवी मुंबई ०२ इतके रुग्णांचे मृत्यू झाले. यामुळे राज्यातील करोनामृत्यूंची एकूण संख्या नऊ हजार २५० इतकी झाली आहे, तर मुंबईतील मृत्यूंचा आकडा पाच हजार ०२ झाला आहे. राज्यात काल पाच हजार १३४ नवे रुग्ण आढळले असून, यामुळे राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या दोन लाख १७ हजार १२१ झाली आहे. कालपर्यंत तपासण्यात आलेल्या ११ लाख ६१ हजार ३११ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी दोन लाख १७ हजार १२१ म्हणजेच १८.६९ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात सह लाख ३१ हजार ९८५ व्यक्ती घरात, तर ४५ हजार ४६३ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.