News

पुणे: करोनाबाधितानं क्वारंटाइन सेंटरमध्येच घेतला गळफास

पुणे: एका करोना बाधित रुग्णाने सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना कोंढवा येथील सिंहगड गर्ल्स होस्टेलमधील विलगीकरण केंद्रामध्ये सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, या आत्महत्येच्या घटनेनंतर अर्ध्या तासात दुसऱ्या एका रुग्णाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना घडली.

गुंडाप्पा शरणाप्पा शेवरे (वय ५५, रा. अप्पर इंदिरानगर) असे आत्महत्या केलेल्या रुग्णाचे नाव आहे. गुंडाप्पा यांचा करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांना ४ जुलै रोजी महापालिकेच्या कोंढवा येथील विलगीकरण केंद्रामध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांचा मुलगाही पॉझिटिव्ह असल्याने तोही त्यांच्यासोबत दाखल झाला होता. ते दोघे आणि आणखी दोन रुग्ण असे चौघे जण एका खोलीत उपचार घेत होते, अशी माहिती कोंढवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली.

सोमवारी सकाळी शेवरे यांचा मुलगा व इतर दोन रुग्ण नाश्ता करण्यासाठी गेले. या वेळी गुंडाप्पा यांनी आतून दार लावून घेतले. त्यांनी कपडे अडकविण्याच्या खुंटीला पांढऱ्या दुप्पट्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचा मुलगा व इतर रुग्ण परत आल्यावर खोलीचा दरवाजा त्यांना बंद दिसला. दरवाजा ढकलून उघडला असता, गुंडाप्पा गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांना दिसले. मागील दोन दिवसांपासून गुंडाप्पा यांचा खोकल्याचा त्रास वाढला होता. यामुळे ते थोडे त्रस्त होते. त्यातूनच त्यांनी गळफास घेतल्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.