इंदुरीकर महाराजांनी तृप्ती देसाईंना दिले लेखी उत्तर
पुणे, 07 जुलै : प्रसिद्ध कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी कीर्तनातून वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनीही कायदेशीर नोटीस बजावली होती. आता या नोटिसीला इंदुरीकर महाराज यांनी वकिलामार्फत उत्तर दिले आहे.
‘अमुक तारखेला स्त्रीसंग केला तर मुलगा होतो व अमुक तारखेला स्त्रीसंग केला तर मुलगी होते. अमुक दिवसात स्त्रीसंग केला तर अपत्य बेवडी व भंगार जन्माला येते. अमुक दिवसात स्त्रीसंग केला तर अपत्य चांगले तयार होते’ अशी आक्षेपार्ह व अंधश्रद्धा पसरविणारे आणि महिलांचा अपमान करणारी वक्तव्य निवृत्ती महाराज देशमुख यांनी जाहीर कीर्तनातून अनेकदा केली होती.
त्यामुळे निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या विरोधात दाखल असलेल्या फौजदारी खटल्यात संगमनेर, जिल्हा अहमदनगर येथील न्यायालयाने दखल घेऊन निवृत्ती महाराज देशमुख यांना ऑगस्ट महिन्यात न्यायालयात हजर होण्याचे आदेश दिले आहेत.
तर निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या विरोधात अहमदनगर जिल्ह्यातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यावर निवृत्ती महाराज देशमुख यांनी दिलगीरही व्यक्त केली होती.
दरम्यान, तृप्ती देसाई यांनी त्यांचे पुणे येथील वकील अॅड मिलिंद दत्तात्रय पवार यांचे मार्फत कायदेशीर नोटीस दिली होती. महिलांची जाहीर माफी मागावी व पुन्हा अशी वकतव्यं करणार नाही असं जाहीर करावे, अशी मागणी केली होती.
त्यानंतर निवृत्ती महाराज देशमुख यांनी त्यांच्या वकिलांमार्फत अॅड मिलिंद दत्तात्रय पवार यांना कायदेशीर उत्तर पाठविले आहे. त्यामध्ये निवृत्ती महाराज देशमुख यांचे कोणी समर्थक नाही. निवृत्त महाराज कुठल्याही समर्थकांना ओळखत नाही. काही अज्ञात लोकांनी काही उद्योग केले असतील तर त्याला निवृत्ती महाराज जबाबदार नाही’ अशी भूमिका निवृत्ती महाराजांकडून मांडण्यात आली.
तसंच, ‘निवृत्ती महाराज देशमुख यांनी आजपर्यंत कधीच कीर्तनातून महिलांना अपमानीत होईल किंवा महिलांचा अनादर होईल असे किंवा अंधश्रद्धा पसरेल असे वक्तव्य जाहीर कीर्तनातून कधीही केलेले नाही. त्यामुळे महाराजांनी महिलांची जाहीर माफी मागावी, असे निवृत्ती महाराज देशमुख यांना वाटत नाही किंवा माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही’ असं स्पष्ट उत्तर या पत्राद्वारे निवृत्ती महाराज देशमुख यांनी दिले आहे.