पैठणमध्ये पोलीस पथकावर हल्ला; आरोपींना जामीन नाहीच!
औरंगाबाद: जुगाराच्या अड्ड्यावर धाड टाकण्यासाठी गेलेल्या उपविभागीय पोलिस अधिकारी व त्यांच्या पथकाला मारहाण केल्याची घटना १८ जून रोजी आडुळ शिवारात (ता. पैठण) घडली होती. या प्रकरणात मुख्य आरोपी राहुल नानाराव बनकर (रा. आडुळ शिवार, ता. पैठण) याने सादर केलेला अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. डी. साळुंके यांनी सोमवारी फेटाळला.
या प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक भागवत सुधाकर मुठाळ (३०, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय) यांनी तक्रार दिली. १८ जून रोजी सायंकाळी सहाच्यासुमारास मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, सहाय्यक पोलिस अधीक्षक गोरख भामरे व त्यांच्या पथकाने आडुळ शिवारातील आरोपी राहुल बनकर याच्या शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारून सात जणांना पकडले होते. त्यात रजापूरचा माजी सरपंच असाराम पाटीलबा गोर्डे व जुगार सुरू असलेल्या शेताचा मालक राहुल बनकर याचा देखील समावेश होता. त्या दोघांनी आपल्या साथीदारांना सोडविण्यासाठी आणखी दहा ते पंधरा जण बोलावले. त्यांच्या हातात काठ्या, कोयता, कुडी होत्या व दोन जण दुचाकीवर आले होते. त्यांनी पोलिसांना धक्काबुक्की करून व धमकी देवून पोलिसांनी कारवाई करून ताब्यात घेतलेल्यात आठ व्यक्तींना पळवून नेले. या प्रकरणात पाचोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्यात अटक होऊ नये यासाठी मुख्य आरोपी राहुल बनकर याने अटकपूर्व जामीनीसाठी अर्ज सादर केला असता न्यायालयाने तो फेटाळला. या प्रकरणात सहाय्यक लोकाभियोक्ता बी. आर. लोया यांनी काम पाहिले.