News

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाच्या तपासात नवीन माहिती उघड, घरामध्ये कुठेही नव्हता CCTV कॅमेरा

मुंबई, 07 जुलै : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) च्या आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलीस तपास करत आहेत. दरम्यान या पोलीस तपासात एक नवीन माहिती समोर आली आहे. ज्या इमारतीमध्ये सुशांत राहत होता, त्याठिकाणचे सर्व सीसीटीव्ही कॅमेरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत मात्र सुशांतच्या घरामध्ये कोणतेही सीसीटीव्ही कॅमेरा (CCTV Camera) बसवण्यात आले नव्हते. सुशांतच्या अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही कॅमेरा फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यासंदर्भातील फॉरेन्सिक अहवालाची पोलिसांना प्रतीक्षा आहे.

दरम्यान सोमवारी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची वांद्रे पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. त्याचा जबाब सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी नोंदवण्यात आला आहे. संजय लीला भन्साळी सुशांत सिंग सोबत 4 चित्रपट  करण्याचा विचार करत होते. तारखांच्या गडबडींमुळे आणि इतर काही कारणांमुळे सुशांत हे चित्रपट करू शकला नाही. यासंदर्भात त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. मुंबई पोलीस सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सर्व शक्यता पडताळून पाहत आहेत. आतापर्यंत 30 पेक्षा अधिक जणांचा जबाब या प्रकरणी नोंदवण्यात आला आहे.