News

केवळ 4,852 रुपयात करा सोनेखरेदी! मोदी सरकारच्या या योजनेत मिळेल अतिरिक्त सूट

नवी दिल्ली, 06 जुलै : मोदी सरकारकडून (Modi Government) स्वस्त सोनं खरेदी करण्याची आणखी एक संधी आजपासून पुन्हा एकदा तुम्हाला मिळणार आहे. त्याचप्रमाणे हे सोने खरेदी करण्यासाठी ऑनलाइन प्रणालीचा वापर केल्यास तुम्हाला आणखी सूट देखील मिळणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) दिलेल्या माहितीनुसार सॉव्हरेन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond) खरेदीसाठीचा  चौथा टप्पा 6 जुलै 2020 पासून सुरू होत आहे.  ही संधी 10 जुलैपर्यंत असणार आहे. यावेळी जारी करण्यात आलेल्या सोन्याच्या बाँडची किंमत  (SGB Issue Price) 4,852 रुपये प्रति ग्रॅम आहे. तसंच सोनेखरेदीसाठी ऑनलाइन अर्ज आणि पेमेंट केल्यास गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूट देखील मिळेल. ऑनलाइन गुंतवणूकदारांसाठी इश्यू प्राइस 4,802 रुपये आहे.

पारंपरिक पद्धतीने सोने खरेदी करण्यापेक्षा सॉव्हरेन गोल्ड बाँड खरेदी करण्याचे अतिरिक्त फायदे मिळतात. सोन्याच्या किंमतीमधील फायद्या व्यतिरिक्त 2.5 टक्के दराने व्याज देखील मिळते. अर्थतज्ज्ञांच्या मते आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये अनिश्चितता असल्या कारणाने सोन्याचे दर येत्या काळात वाढू शकतात.

सॉव्हरेन गोल्ड बाबतच्या महत्ताच्या गोष्टी

-केंद्र सरकार सॉव्हरेन गोल्डमध्ये गुंतवणूक करण्याची संधी तेव्हा देत आहे, जेव्हा देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमती सतत वाढत आहेत. बुधवारी वायदे बाजारात सोन्याचे भाव 48,982 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते.

-रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सॉव्हरेन गोल्ड बाँड जारी करतात. 2015 मध्ये ही योजना पहिल्यांदा जारी करण्यात आली होती. जेणेकरून बाजारातील फिजिकल सोन्याची मागणी कमी करता येईल. देशांतर्गत बाजारात आर्थिक बचत करणे हा देखील यामागचा एक हेतू होता.

– भारत बुलियन अँड असोसिएशन लिमिटेडकडून गोल्ड बाँड जारी करण्याच्या आधीच्या आठवड्यातील शेवटच्या 3 व्यवहाराच्या दिवसात 999 शुद्धतेच्या सोन्याच्या किंमतीच्या आधारे या बाँडच्या किंमती ठरतात.

-यामध्ये गुंतवणूक करताना तुम्ही एका आर्थिक वर्षामध्ये 500 ग्रॅम सोन्याचे बाँड खरेदी करू शकता. कमीतकमी गुंतवणूक 1 ग्रॅमची आहे.

-चौथ्या टप्प्यातील गोल्ड बाँडच्या इश्यूची तारीख 14 जुलै आहे.

-Sovereign Gold Bond ची विक्री बँक, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, निवडण्यात आलेले पोस्ट आणि एनएसई तसच बीएसईच्या माध्यमातून होते. यातील कोणत्याही ठिकाणी जाऊन तुम्ही बाँड योजनेमध्ये सामील होऊ शकता.