News

खासगी हॉस्पिटलकडून दरोडा, 500 च्या PPE कीटची किंमत ऐकून पालिकाही हादरली

नाशिक, 05 जुलै : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. शासकीय रुग्णालय खचाखच भरलेली आहे. तर दुसरीकडे खासगी हॉस्पिटलमध्ये रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा दर लावून पैसे वसूल करत आहे.

नाशिकमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. तर दुसरीकडे खाजगी हॉस्पिटल्सकडून उपचारांच्या नावाखाली रुग्णांच्या खिश्यावर  दरोडा घातला जात आहे. कोरोनाची भीती दाखवून संशयितांकडून अवास्तव वसुली केली जात आहे.

कोरोना संशयित रुग्णाला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.  उपचाराअंती हाती आलेल्या बिलामुळे एकच खळबळ उडाली आहे. या बिलात 500 रुपयांच्या PPE किटची किंमत तब्बल 10 हजार रुपये दाखवण्यात आली आहे.

या रुग्णाला 10 दिवसांचे बिल चक्क 2 लाख 75 हजार इतके देण्यात आले. 10 दिवसात 2 लाखांचे बिल पाहून रुग्णाला एकच हादरा बसला.

त्यानंतर या रुग्णाने रीतसर पालिकेकडे तक्रार दाखल करून घडलेला प्रकार समोर आणला. त्यानंतर पालिकेनं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. पालिकेकडे कोरोना संशयित रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा बिल आकारणाऱ्या खासगी रुग्णांना नोटीस बजावण्यात आली आहे.

नाशिक पालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी या प्रकरणी 22 लेखपरिक्षकांची टीम तयार केली आहे. ज्या हॉस्पिटलची तक्रार करण्यात आली आहे. अशा तक्रार करण्यात आलेल्या हॉस्पिटल्सचा आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू आहे. या तपासणीत अनेक गंभीर गोष्टी आल्या समोर आहे. त्यामुळे पालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी अशा हॉस्पिटल्सवर कडक कारवाईचे संकेत दिले आहे.