News

क्वारंटाइन सेंटरमध्ये दारू न मिळाल्यानं तरुणानं उचललं टोकाचं पाऊल

रामपूर, 05 जुलै: जीवापेक्षा जास्त महत्त्वाची दारू असणाऱ्या एका तरुणानं तर दारू मिळाली नाही म्हणून टोकाचं पाऊल उचललं आहे. क्वारंटाइन सेंटरमधून तिसऱ्या मजल्यावरून या तरुणानं उडी मारली होती. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. ही घटना उत्तर प्रदेशातील रामपूर परिसरातील आहे.

डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार या तरुणाला दारूची नशा होती. या नशेच्या आहारी गेल्यानं तरुणाला क्वारंटाइन सेंटरमध्येही राहावत नव्हते. दारू न मिळाल्यानं हा तरुण खूप चिडचिडा झाला होता. त्याच्या भावनांवरील नियंत्रण सुटलं होतं. हा तरुण तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला की त्यानं आत्महत्या केली याबाबत सध्या तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

दारूच्या आहारी गेलेले तरुण न मिळाल्यानं कुणी सॅनिटायझर तर काही जण अल्कहोल असलेली औषध पित असल्याचं गेल्या काही दिवसांमध्ये समोर आलं.त्यानंतर उत्तर प्रदेशातील रामपूरमधील क्वारंटाइन सेंटरमध्ये घडलेल्या या घटनेनं तर परिसरात खळबळ उडाली.

याआधी देहरादूनमध्ये 19 वर्षांच्या युवकाचा मृतदेह क्वारंटाइन सेंटरमध्ये मिळाल्यानं खळबळ उडाली होती. धक्कादायक बाब म्हणजे क्वारंटाइन सेंटरमध्ये दोन दिवसांपासून हा मृतदेह पडून होता तरीही कोणालाही याबाबत माहिती नव्हती त्यामुळे नियंत्रण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांचा तपास सुरू आहे.