इंदोरीकरांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश!
३ जुलै :- पुत्र प्राप्तीबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी इंदोरीकर महाराज यांना पुढील महिन्यात 7 ऑगस्ट रोजी हजर राहण्याचे आदेश संगमनेर न्यायालयाने दिले आहेत. आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी इंदोरीकर महाराजांविरोधात पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याची पहिली सुनावणी आज संगमनेर न्यायालयात झाली. मात्र आज केवळ समन्स बजावण्यात आला.
इंदोरीकर महाराज यांनी फेब्रुवारी महिन्यात पुत्र प्राप्तीबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत अनेक सामाजिक संघटना आणि अंधश्रद्धा निर्मूलनातील कार्यकर्त्यांनी इंदोरीकर महाराजांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकारी रंजना गवांदे यांच्या तक्रारीनंतर 26 जून रोजी संगमनेर कोर्टात PCPNDT कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावर आज संगमनेर कोर्टात पहिली सुनावणी झाली. त्यामुळे आज न्यायालय काय आदेश देणार याकडे लक्ष लागलं होतं. मात्र आज फक्त त्यांना समन्स बजावण्याची ऑर्डर काढण्यात आली.