नृत्याची सात्विकता जपणाऱ्या सरोज खान काळाच्या पडद्याआड़
बॉलिवूडच्या प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शका सरोज खान यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. मुंबईच्या वांद्र्यातील गुरुनानक रुग्णालयात त्यांनी वयाच्या 71 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सरोज खान यांची कोरोना चाचणीही करण्यात आली होती. ती निगेटिव्ह आली होती. मात्र गुरुवारी मध्यरात्री त्यांना अत्यवस्थ वाटू लागले आणि उपचार सुरु असताना रात्री दोनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
श्वास घेण्यास त्रास होत असल्याने सरोज खान यांना 20 जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही झाल्याचंं कुटुंबीयांकडून सांगण्यात येत होतं. परंतु मध्यरात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यामुळे त्यांचं निधन झालं.चारकोप इथल्या कब्रस्तानमध्ये आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
सरोज खान यांनी श्रीदेवी, माधुरी दीक्षित आणि आलिया भट्ट यां अभिनेत्रींसह बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना डान्स शिकवला होता. त्यांनी आतापर्यंत जवळपास 2 हजारांहून अधिक गाण्यांची कोरियोग्राफी केली होती. कोरिओग्राफी करण्याआधी 50च्या दशकात सरोज खान बँकग्राउंड डान्सर म्हणून काम करत होत्या. 1974मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट ‘गीता मेरा नाम’मध्ये त्यांनी कोरिओग्राफर म्हणून काम पाहिलं. त्यानंतर त्यांनी बॉविवूडच्या अनेक बड्या अभिनेत्रींना डान्स करायला शिकवलं.