Newsराजकारण

महापूजेसाठी 9 तास गाडी चालवत मुख्यमंत्री पोहोचले पंढरपूरमध्ये

मुंबई 2 जुलै: कोरोनामुळे यंदा वारीचा नेहमीचा सोहळा झाला नाही. मात्र मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी शासकीय महापूजा मात्र संपन्न झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे (Uddhav and Rashmi Thackeray) यांनी ही महापूजा केली. त्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे हे मुंबईवरून स्वत:गाडी चालवत पंढरपूरमध्ये पोहचले. 9 तास त्यांनी स्वत: ड्रायव्हिंग केली. यावेळी त्यांच्यासोबत रश्मी आणि आदित्य ठाकरेही होते. कोरोनामुळे गेले काही दिवस मुख्यमंत्री स्वत:च कार चालवत बैठकांना आणि इतर कार्यक्रमांना जात आहेत. 1 जुलैला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची महापूजा झाली होती.

स्वत:च कार चालवत पंढरीला महापूजेसाठी जाणारे उद्धव ठाकरे हे पहिलेच मुख्यमंत्री ठरले आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत त्यांच्या सुरक्षेचा ताफाही होता. मात्र कोरोनामुळे त्यांनी ड्रायव्हरला सुट्टी दिली आहे.

मुख्यमंत्री ठाकरे रात्री साडेआठ वाजता पंढरपूरला पोहोचले. तिथे गेल्यानंतर त्यांनी आराम केला आणि पुन्हा रात्री अडीच वाजता ते महापूजेसाठी मंदिरात दाखल झाले.

महापूजेसाठी मुख्यमंत्री स्वत: कार चालवत पंढरपूरमध्ये आल्याने सगळ्यांनाच आनंद झाला. या आधी मुख्यमंत्र्यांनी आषाढी वारीच्या सोहळ्याचं छायाचित्रणही केलं आहे. त्यासाठी त्यांनी अवघड असलेल्या हवाई छायाचित्रणाचा आधार घेतला होता. चालत्या हेलिकॉप्टरमधून फोटो काढणं हे अतिशय आव्हानात्मक आणि जोखमीचं काम असतं. त्या फोटोंचं पुस्तकही निघालं असून ते पुस्तक प्रचंड गाजलं आहे.