News

रेल्वे कारखान्यात भीषण स्फोट, आगीचा उडाला भडका ; 3 कामगार जखमी

छपरा, 02 जुलै : बिहारमधील छपरा जिल्ह्यातील दरियापूर येथील रेल्वे कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात 3 कर्मचारी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. स्फोट झाल्यानंतर कारखान्यात आगीचा भडका उडाला असून अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव आग आटोक्यात आणली.

सारणचे पोलीस अधिकारी किशोर राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, कारखान्यातील बॉयलरमध्ये एका वस्तू पडली होती. त्यामुळे हा स्फोट झाला. हा स्फोट भीषण होता, त्यामुळे कारखान्यात एकच गोंधळ उडाला. यात 3 कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळावर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव बचावकार्य सुरू केले आहे.

दरम्यान, या कारखान्यात स्फोट नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. रेल्वे कारखान्याच्या अधिकाऱ्यांनीही यावर बोलण्यास नकार दिला आहे. परंतु, हा स्फोट इतका भीषण होता की, कारखान्यातील खिडकीच्या काचा तुटल्या. स्फोटाचा हादरा परिसरातील  भागात जाणवला.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कारखान्यातून मोठा आवाज झाला. त्यानंतर अचानक आग लागली आणि मोठ्या प्रमाणात धूर बाहेर येत होता. कारखान्यातील अनेक कामगारांनी बाहेर धाव घेतली होती.

कारखान्यात बॉयलरमध्ये हा स्फोट झाला होता. या बॉयलर जवळ काम करणारे 3 कामगार जखमी झाले होते. जखमी कामगारांना शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.  तिन्ही कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे.