News

एका लग्नसोहळ्याच्या दुसऱ्याच दिवशी नवरदेवाचा कोरोनामुळे मृत्यू झाला, 100 पाहुणे कोरोना पॉझिटिव्ह

पटना, 30 जून: देशात कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus) हाहाकार माजला आहे. यामाहा मारीन अनेकांचे जीव घेतले. अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली अशातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आनंदाच्या अशा लग्न सोहळ्यामध्ये कोरोनाने शिरकाव केल्यामुळे क्षणात शोककळा पसरली आहे. लग्नसोहळ्याच्या दुसऱ्याच दिवशी नवरदेवाचा मृत्यू झाला. तर आता तब्बल पंधरा दिवसांनी त्याच लग्न सोहळ्यात उपस्थित असलेले 100 पाहुणे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे.

बिहारच्या पालीगंज येथे ही घटना घडली आहे. एकाच लग्न सोहळ्यातून तब्बल शंभर लोकांना कोरोनाची लागण झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे लग्न झाल्यानंतर कधी दुसर्‍याच दिवशी नवरदेवाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. बिहारमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. सुमारे दहा हजार रुग्ण कोरोना संक्रमित आहेत.

350 जणांची केली कोरोना चाचणी

मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणात तीनशे ते साडेतीनशे लोकांची कोरोना चाचणी केली गेली आहे. यामध्ये वधू आणि वर पक्षातील नातेवाईक पाहुणे याचबरोबर फोटोग्राफर आणि ज्या ठिकाणी लग्न सोहळा झाला त्या ठिकाणी काम करणार्‍या कर्मचार्‍यांची ही कोरोना चाचणी करण्यात आली आहे. या सगळ्यांचे रिपोर्ट आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर पोलिसांकडून सध्या मेडिकल टीम अलर्ट मोडवर काम करत आहे.

दरम्यान, देशात कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा वेग कमी होत असल्याचं मागच्या 24 तासात दिसून आलं आहे. त्यामुळे थोडी चिंता कमी झाली आहे. नुकत्याच केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार भारतात 24 तासांत 18 हजार 522 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा 5 लाख 66 हजार 840 वर पोहोचला असून त्यापैकी 2,15,12 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 3 लाख 34 हजार 822 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोनामुळे मागच्या 24 तासांत 418 रुग्णांचा मृत्यू झाल्यानं मृतांचा आकडा 16 हजार 893 वर पोहोचला आहे. महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, गुजरातमध्ये कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण आहेत. कोरोना व्हायरस या संसर्गजन्य आजारातून रुग्ण बरे होण्याचा आतापर्यंतचा दर 59.6% झाला आहे. त्यामुळे ही थोडी दिलासा देणारी बाब आहे.