News

पंढरपुरात उद्यापासून संचार बंदी, केवळ ‘या’ नागरिकांना मिळणार पूजेसाठी मंदिरात प्रवेश

पंढरपूर, 29 जून: आषाढी एकादशीला अर्थात पंढरपूर यात्रेला गर्दी होऊ नये यासाठी उद्या म्हणजेच 30 जूनपासून 2 जुलैपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे. ज्यांना पासेस दिले आहेत, अशा नागरिकांनाच महापूजेसाठी मंदिरात प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे.

पंढरपूर शहर आणि परिसरातील 10 गावात उद्या दुपारी 2 वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. नागरिकांना केवळ आरोग्यविषयक कारणासाठी घराबाहेर पडता येईल, असंही पोलिस अधीक्षकांनी सांगितलं आहे.

आषाढी वारी अखेरच्या टप्प्यात आहे. 1 तारखेला आषाढी एकादशी आहे. परंतु कोरोनामुळे कोणालाही पंढरपुरात प्रवेश दिला जात नाही. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने शहरात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारीच्या माध्यमातून दरवर्षी 12 ते 15 लाख वारकरी पंढरपुरात दाखल होतात. यंदा मात्र कोरोनामुळे आषाढी वारी रद्द करण्यात आली आहे. केवळ मानाच्या पालख्यांनाच पंढरपुरात शहरात प्रवेश दिला जाणार आहे. शहराच्या प्रवेशद्वारावर नाकाबंदी करण्यात आली आहे.

38 वारकऱ्यांना परत गावी पाठवलं…

आषाढी यात्रेसाठी त्रिस्तरीय नाकाबंदी असतानाही नजर चुकवून आडमार्गाने शहरात प्रवेश करणाऱ्या 38 भाविकांना पोलिसांनी हात जोडून परत जाण्याची विनंती केली. त्यांच्या गांधीगिरीमुळे भाविकांनीही पंढरीच्या सीमेवरूनच पांडुरंगाचे दर्शन घेऊन परत गावाकडचा रस्ता धरला.

कोरोना वारीमुळे आषाढी वारीवरही संकट आले आहे. यामुळे महत्त्वाच्या पालख्यांची वारीही रद्द केली आहे.

पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर भाविक आल्यास आणखी धोका वाढू शकतो, हे विचारात घेऊन पालखी वारीदेखील रद्द केली आहे. त्यामुळे भाविकांनी येथे येऊ नये, यासाठी 24 तास शहर, तालुका व जिल्हा सीमा अशी त्रिस्तरीय नाकाबंदी केली आहे. सोमवारपासून संचारबंदी प्रस्तावित आहे.