News

शरद पवार यांच्या ताफ्यातील वाहनाला भीषण अपघात

पुणे, 29 जून: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ताफ्यातील एका वाहनाला भीषण अपघात झाला आहे. मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर किलोमीटर 46 जुन्या अमृतांजन ब्रीजजवळ हे अपघात झाला आहे. अपघातात चार जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे

मिळालेली माहिती अशी की, मुंबईकडे जात असताना शरद पवार यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या वाहनाचे स्टेअरिंग लॉक झाल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात चार पोलिस जखमी झाले आहेत. पोलिस वाहनाचं मोठं नुकसान झालं आहे.

दरम्यान, मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर सोमवारी पहाटेपासून घडलेला हा दुसरा अपघात आहे. आजचा दिवस अपघाताचा वार ठरला आहे. आज पहाटे घडलेल्या भीषण अपघातानंतर खंडाळा घाटात पोलीस कर्मचाऱ्यांच्या वाहनाला अपघात झाला. या अपघातात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला.

खंडाळा घाटात जुन्या अमृतांजन पुलाजवळ हा अपघात झाला. पुण्यातील पोलीस कर्मचारी मुंबईकडे येत होते. त्यावेळे अचानक वाहनावरील ताबा सुटला आणि महामार्गाच्या मधोमध गाडी पलटी झाली. या अपघातात एक पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे. तर तीन जण सुखरूप आहे. सुमो गाडी पलटी झाल्यामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यानंतर अपघातग्रस्त सुमो गाडी महामार्गावरून हटवण्यात आली.

भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

दरम्यान, मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आज पहाटे एका भीषण अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. खालापूर टोल नाक्याजवळ मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव ट्रेलरने पुढे जाणाऱ्या स्विफ्ट तसेच टेम्पोला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू तर चार जण जखमी असल्याची माहिती देण्यात आली आहे.