लग्नसोहळा आयोजित करणाऱ्याला 6 लाखांचा दंड, काय आहे कारण?
भीलवाडा, 27 जून : राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी तेथील एका व्यक्तीला 6 लाख 26 हजार 600 रुपयांचा दंड ठोठावला आहे. वास्तविक, या व्यक्तीने 13 जून रोजी आपल्या मुलाच्या लग्नासाठी 50 हून अधिक लोकांना आमंत्रित केले होते. समारंभात हजेरी लावल्यानंतर येथील 15 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले. या संसर्गामुळे एकाचा मृत्यू झाला आहे.
विशेष म्हणजे राजस्थानमधील प्रशासनाने कडक लॉकडाऊन पाळला आहे. कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन अंतर्गत देण्यात आलेल्या सूचनांविषयी प्रशासन फारच सावध आहे. लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांचे मोठ्या संख्येने चलान कापली आहेत. राजस्थानात साथीच्या अध्यादेशाअंतर्गत आतापर्यंत 1 लाख 36 हजारांहून अधिक जणांचे चलान कापले असून त्यांच्याकडून 2 कोटी 35 लाखांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे.
मास्क न लावल्याबद्दल 66 हजाराहून अधिक लोकांना दंड
पोलीस महासंचालक बी.एन सोनी यांनी सांगितले की सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावणाऱ्या 66 हजारांहून अधिक लोकांकडून दंड वसूल करण्यात आला आहे.
तर सोशल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्या 63 हजार लोकांचे चलान कापण्यात आले आहे. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, मद्यपान करणे व गुटका-तंबाखू खाणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई देखील करण्यात आली आहे. त्याचवेळी मोठ्या प्रमाणात वाहने जप्त केली असून त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांचा दंडही आकारण्यात आला. त्यानंतर अजूनही कारवाई सुरू आहे.