महाराष्ट्र

खासदार अमोल कोल्हेंचा आक्षेप!

२५ जून :-कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असताना दररोज कोरोनावरील औषध निर्मितीबद्दल काही ना काही दावे केल्याचे समोर येत आहे. कोरोनावर काही औषधं परिणामकारक ठरत असल्याचा दावा काही कंपन्या तसेच डॉक्टरांनी केला आहे. मात्र यातील एका औषधावर डॉक्टर असलेल्या खासदार अमोल कोल्हे यांनी आक्षेप नोंदवला आहे. फॅबीफ्लू नावाच्या औषधावर त्यांनी आक्षेप नोंदवले असून त्यांनी याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना एक सविस्तर पत्र देखील लिहिलं आहे. यासंदर्भात खासदार कोल्हे यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. ‘ग्लेनमार्क’ कंपनीच्या ‘फॅबिफ्ल्यु’बाबतच्या दाव्याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तातडीने पावले उचलावीत आणि निर्बंध आणावेत. तसेच ‘डीसीजीआय’, आयसीएमआर मार्फत जाहीर चर्चा घडवून आणावी, अशी विनंती डॉ. कोल्हे यांनी पत्रात केली आहे.