News

पाऊस राज्यात पुन्हा होणार सक्रिय, या दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज

पुणे, 26 जून : गेली आठवडाभर दडी मारून बसलेला मान्सून येत्या चार ते पाच दिवसात पुन्हा कमबॅक करेल असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. मान्सून नियोजित वेळापञकाच्या तब्बल 12 दिवस आधीच संपूर्ण देशभरात पोहोचला असून जूनच्या सरासरीच्या तुलनेत देशात 21 टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे. राज्यातही सरासरीपेक्षा पाऊस पडल्याचं पुणे वेधशाळेचे प्रमुख संशोधक डॉ. अनुपम कश्यपी यांनी म्हटलं आहे.

खरंतर, यंदा देशावर कोरोनाचं संकट आहे. अशात चक्रीवादळाने अनेक राज्यांचं नुकसान झालं. अजूनही आसमानी संकटाचा धोका टळलेला नाही. त्यामुळे मुसळधार पावसाच्या आधी राज्यातील शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल योग्य त्या ठिकाणी साठवावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, मान्सूनचे वारे देश व्यापत असल्याची चांगली बातमी येत असतानाच निसर्गाचा दुर्दैवी फटका उत्तर भारतात काही भागात विशेषतः बिहारमध्ये बसला. पावसानं काही भागात थैमान घातलं. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसाने बिहारमध्ये एकाच दिवसात 83 जणांचा जीव घेतला.

भारतीय हवामान विभागाने उत्तर भारतात अनेक ठिकाणी रेड अलर्ट जारी केलेला. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ढग आणि पावसाची लक्षणं दिसल्यावर लोकांना आपापल्या घरातच राहाण्याचं आवाहन केलं. नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असंही आवाहन त्यांनी केलं आहे. 83 मृतांच्या नातेवाईकांना 4 लाखांची मदत नितीश कुमार यांनी जाहीर केली आहे.