News

गोपीचंद पडळकरांविरोधात गुन्हा दाखल

बारामती, 25 जून : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर विखारी टीका करणाऱ्या भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. तर  बारामतीमध्ये गोपीचंद पडळकरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘शरद पवार हे महाराष्ट्राला लागण झालेले कोरोना आहे’, अशा शब्दात गोपीचंद पडळकर यांनी विखारी भाषेत टीका केली होती. पडळकर यांच्या टीकेमुळे राज्यात तीव्र पडसाद उमटले आहे. आज राज्यभरात ठिकठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पडळकरांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलनं करत आहे.   बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने शहर पोलीस स्टेशनला गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली होती. ‘जो पर्यंत गुन्हा दाखल होत नाही. तोपर्यंत पोलीस स्टेशनवर ठिय्या मांडणार’, असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला. अखेर पोलिसांकडून गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पडळकर यांच्यावर 505(2)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर औरंगाबादेतही  गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला. शहरातील क्रांतिचौक येथे निदर्शने करण्यात आली.  यावेळी कार्यकर्त्यांनी पडळकरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत पडळकर यांच्या प्रतिमेला चपलांचा मार दिला आहे. एवढंच नाहीतर पडळकर यांचा मुखवटा घालून  तरुणाला उठाबशा काढण्यास लावल्या आहे.

मनमाडमध्येही  शरद पवार यांच्या बाबतीत गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्त्याव्याचे पडसाद  उमटले. राष्ट्रवादीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी तलाठी कार्यलयाच्या आवारात तीव्र निदर्शने करून पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करत तिचे दहन केले.

तर सोलापूरमध्ये आज सकाळी शहरातील चार हुतात्मा स्मारकाजवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकरांविरोधात गाढव आंदोलन केले.  गाढवाच्या चेहऱ्यावर गोपीचंद पडळकरांची प्रतिमा लावून निषेध करण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करून पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.