News

PAN-आधार लिंक करण्याची डेडलाइन वाढवली

नवी दिल्ली, 25 जून : केंद्र सरकारने आधार कार्ड (Aadhar Card) आणि पॅन कार्ड (PAN Card) लिंक करण्याची तारीख 30 जून 2020 वरून 31 मार्च 2021 करण्यात आली आहे. याआधी अनेकदा आधार-पॅन लिंक करण्याची तारीख वाढवण्यात आली होती. मात्र सध्या कोरोना व्हायरसमुळे लोकांची आर्थिक कामं खोळंबली आहेत. परिणामी पॅन-आधार लिंक करण्याची तारीख वाढवण्यात  आली आहे. त्याचप्रमाणे करदात्यांना दिलासा देण्यासाठी आर्थिक वर्ष 2018-19 साठी इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची तारीख देखील वाढवून 31 जुलै 2020 करण्यात आली आहे. आयकर विभागाकडून अशी माहिती देण्यात आली आहे की, केंद्र सरकारने कोरोना व्हायरसचे वाढते संकट पाहता नागरिकांना दिलासा देण्यासाठी अनेक आर्थिक कामांच्या डेडलाइन वाढवल्या आहेत.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर दोन्ही दस्तावेज लिंक करणे झाले अनिवार्य

देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने 2018 मध्ये दिलेल्या निर्णयानंतर पॅन कार्ड आधार कार्डाशी जोडणे अनिवार्य झाले आहे. त्याचप्रमाणे जर तुम्ही नवीन पॅनसाठी अर्ज करत असाल तरी देखील आधार कार्डवरील 12 अंकी नंबर देणे आवश्यक असते.

नवीन पॅनकार्डसाठी अर्ज केल्यानंतर आपोआप तुमचे पॅन आधारशी लिंक होईल. तर सध्या ज्यांच्याकडे पॅन आहे, त्यांना डेडलाइनआधी ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास तुमचे PAN निष्क्रिय होईल अशी माहिती आयकर विभागाकडून देण्यात आली आहे.

आधार-पॅन लिंकिंग कसं कराल?

आधार पॅन लिंकिंगसाठी incometaxindiaefiling.gov.in या संकेतस्थळावर जा.

-तिथं तुम्हाला आधार लिंकचा पर्याय दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर CLICK HERE या पर्यायावर क्लिक करून माहिती द्या.

-तुम्हाला आधार-पॅन लिंक आहे किंवा नाही याची माहिती मिळेल. लिंकिंग झालं नसेल तर तुमचा पॅन नंबर, आधार नंबर, नाव आणि कॅप्चा दिल्यानंतर ‘लिंक आधार’ पर्यायावर क्लिक करा.तुमचे आधार पॅन कार्ड लिंकिंग होऊन जाईल.

-‘View Link Aadhaar Status’  वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक झालं आहे की नाही ते समजेल

-याची माहिती तुम्हाला 567678 किंवा 56161 यावर एसएमएस पाठवूनही मिळवता येते.

-UIDPAN<space><आधार क्रमांक><space><पॅन क्रमांक> हा मेसेज वर दिलेल्या क्रमांकावर पाठवाला लागेल. त्यानंतर तुम्हाला आधार पॅन लिंक झाले की नाही हे समजेल.