News

केंद्रात फेरबदलाचे वारे

सुरेश प्रभू, पूनम महाजन यांची नावे आघाडीवर

केंद्रीय मंत्रिमंडळाचा येत्या पंधरवड्यात विस्तार आणि फेरबदल होण्याची शक्यता असून माजी मंत्री सुरेश प्रभू तसेच युवा नेत्या पूनम महाजन यांची नावे आघाडीवर आहेत, तर दुसरीकडे रावसाहेब दानवे व अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांची गच्छंती होण्याची शक्यता आहे

मोदी-2 सरकारच्या स्थापनेला अलीकडेच एक वर्ष पूर्ण झाले आहे. मंत्रिमंडळ फेरबदल व विस्ताराची याआधीही चर्चा झाली होती. तथापि, मार्च महिन्यापासून उद्भवलेले कोरोना विषाणूचे संक्रमण आणि त्यानंतर चीनसोबत सुरू असलेला तणाव यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला होता. आता तो नजीकच्या काळात होण्याची शक्यता आहे. भाजपमधील संघटनात्मक फेरबदल मंत्रिमंडळ विस्तारानंतर होतील.

महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्रिपदासाठी जी नावे चर्चेत आहेत, त्यात माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचे नाव आघाडीवर आहे. मोदी-2 सरकारच्या स्थापनेवेळी प्रभू यांना अनपेक्षितपणे वगळण्यात आले होते. भाजपचे ज्येष्ठ नेते स्व. प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांनादेखील मंत्री बनविले जाऊ शकते. भाजपच्या युवा संघटनेची जबाबदारी मागील काही वर्षांपासून त्या सांभाळत आहेत.

मध्य प्रदेशातील नेते ज्योतिरादित्य शिंदे हे नुकतेच भाजपकडून राज्यसभेवर निवडले गेले आहेत. शिंदे यांना केंद्रात कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद दिले जाणार असल्याचे कळते. भूपेंद्र यादव आणि सरोज पांडे या नेत्यांचाही मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ शकतो, अशी माहितीही सूत्रांनी दिली.