फडणवीसांनी सांगितला त्या दिवसांतला घटनाक्रम
मुंबई | विधानसभेच्या निवडणुकीनंतर सरकार स्थापन होण्यास झालेला सत्तासंघर्ष अख्ख्या महाराष्ट्राने पाहिला. अचानक एके दिवशी सकाळी देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार यांच्या साथीने सरकार बनवलं. पण दोन दिवसांतच ते सरकार कोसळलं. नेमक्या कोणत्या गोष्टीने हे सरकार पडलं आणि या दरम्यानचा घटनाक्रम काय होता याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केलाय.
द इनसाईडरला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस म्हणाले, ‘ज्यावेळी शिवसेना आमच्यासोबत येत नसल्याचं लक्षात आलं. त्यावेळी इतर पर्यांयमध्ये एक पर्याय होता तो म्हणजे आम्हाला थेट राष्ट्रवादीची ऑफर होती. यासंदर्भात योग्य त्या चर्चा देखील करण्यात आल्या होत्या. मात्र या चर्चा झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या प्रमुखांनी आपली भूमिका बदलली. आपल्या हातात हे सरकार येणार नाही म्हणून 3-4 दिवसांत कोणतीही कृती करण्यात आली नाही.”
फडणवीस पुढे म्हणाले, “त्या 3-4 दिवसांनंतर अजित पवारांशी आमची चर्चा झाली. त्यांनी आम्हाला असं सांगितलं की माझ्या मते हे तीन पक्षाचं सरकार चालू शकणार नाही. राज्याला स्थिर सरकार भाजप-राष्ट्रवादी देऊ शकेल. त्यामुळे तुमच्यासोबत सरकार बनवण्यास मी तयार आहे”
‘त्यावेळी अजित पवारांकडे पुरेसं संख्याबळ असल्याने सकाळी शपथविधी करण्याचा निर्णय झाला. मात्र त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्याविरोधात गेला नसता तर ते सरकार 100 टक्के टिकलं असतं. दुर्देवाने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय विरोधात लागला आणि ते सरकार कोलमडलं’ असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.