कोरोनाच्या भीतीनं कोरोनाच्या भीतीनं रिक्षाचालकाची आत्महत्या, कॅनॉलमध्ये उडी मारून दिला जीव
पुणे, 23 जून: कोरोना विषाणूची बाधा होईल, या भीतीनं पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील धायरी येथील एका रिक्षाचालकानं कॅनॉलमध्ये उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अनिल बाबुराव खाटपे (54, रा. बडदे चाळ , गारमाळ, धायरी, पुणे) असे आत्महत्या केलेल्या रिक्षाचालकाचं नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोमवारी रात्री आठच्या सुमारास एका पुरुषाचं मृतदेह लगड मळ्याच्या पाठमागील कॅनॉल लगतच्या एका झुडुपात अडकल्याचे दिसल्यानं खळबळ उडाली होती. एका नागरिकानं याबाबत पोलिसांना माहिती दिली. नंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी मृतदेह कॅनॉलबाहेर काढला. मृत व्यक्तीच्या खिशात एक सुसाईड नोट आणि ड्रायव्हिंग लायसन्स आढळले आहे. पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेऊन घटनेची माहिती दिली. कोरोना विषाणूची बाधा होईल, या भीतीनं आत्महत्या करत असल्याचं सुसाईड नोट लिहिलं आहे.
आणखी एक सुसाईड नोट सापडली घरात…
रिक्षाचालक अनिल यांच्या खिशात ठेवलेली सुसाईड नोट पाण्यात भिजल्यानं त्यातील अक्षरे अस्पष्ट दिसत आहेत. ‘मला कोरोना आजार होईल व त्याच्या त्रासाने हाल होऊन मरण्यापेक्षा मी स्वतःच आत्महत्या करून मरतो’, अशा आशयाचा मजकूर लिहून त्यांनी कॅनॉलमध्ये उडी मारून आत्महत्या केली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान त्यांनी आणखीन एक सुसाईड नोट घरात लिहून ठेवल्याचे त्यांच्या कुटुंबियांना नंतर आढळून आले असून पुढील तपास सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार रुस्तम शेख हे करीत आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार असून ते सायंकाळी घरातून न सांगता निघून गेल्याचे माहिती समोर आली आहे.