News

11 दिवसांत 1800 रुपयांनी वाढल्या सोन्याच्या किंमती, 53 हजारांवर जाऊ शकतात दर

नवी  दिल्ली, 22 जून : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याने नवे रेकॉर्ड रचले आहेत. सोमवारी 24 कॅरेट  सोन्याच्या किंमतीमध्ये 647 रुपयांची वाढ झाली आहे. परिणामी सोमवारी सोन्याचे भाव (Gold Prices Today) प्रति तोळा 48,300 रुपयांवर पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती वाढल्यानंतर आज सकाळच्या सत्रामध्ये एमसीएक्सवर ऑगस्ट महिन्यासाठी सोन्याचे भाव 0.7 टक्क्यांनी वाढून 48,289 रुपयांवर पोहोचले होते. तर जुलैसाठी चांदीचे दर 1.2 टक्क्यांनी वाढून 49,190 रुपये प्रति किलो झाले आहेत.

दरम्यान आज सोन्याच्या स्पॉट किंमतीत झालेले बदल महत्त्वपूर्ण आहेत. व्यवहाराच्या दहा दिवसांमध्ये सोन्याचे दर एकूण 1174 रुपयांनी वाढले होते. आज सराफा बाजारात 647 रुपयांची वाढ झाली, ती देखील यामध्ये जोडल्यास व्यवहाराच्या एकूण 11 दिवसांमध्ये एकूण 1821 रुपयांची वाढ झाली आहे.

सोन्याच्या किमतीत वाढ होण्याची महत्त्वाची दोन कारणं म्हणजे-जगभरात कोरोनाच्या प्रकरणात होणारी वाढ आणि भारत-चीनमधील संघर्ष. गेल्या अकरा दिवसात सोन्यामध्ये प्रति तोळा1821 रुपयांची वाढ झाली आहे तर चांदीचे दर प्रति किलो 1161 रुपयांनी वाढले आहेत. आज सोन्याची किंमत प्रति तोळा 48300 रुपये तर चांदीची किंमत प्रति किलो 49061 रुपये इतकी आहे. 8 जून रोजी सोन्याची स्पॉट किंमत 46,479 रुपये प्रति तोळा होती तर 22 जून रोजी ही किंमत 48,300 झाली आहे. (24 कॅरेट)

सोन्याच्या किंमती 53 हजारांवर जाण्याची शक्यता

लाइव्ह हिंदूस्तानने दिलेल्या बातमीनुसार यावर्षी सोन्याच्या किंमती 53,000 रुपये प्रति तोळा होऊ शकतात. केडिया कमोडिटीचे प्रबंध संचालक अजय केडिया यांनी असं मत व्यक्त केले आहे. जागतिक अर्थव्यवस्थेची परिस्थिती बिकट असल्यामुळे जगभरातील केंद्रीय बँका व्याजदरांमध्ये आणखी कपात करण्याची शक्यता आहे. शेअर बाजारात देखील अनिश्चितता आहे. अशावेळी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जाते.