रुग्णालयाच्या ५ व्या मजल्यावरून उडी मारून महिलेची आत्महत्या
पुणे: रास्ता पेठेतील एका हॉस्पिटलच्या पाचव्या मजल्यावरून महिलेने उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी पहाटे घडली. या महिलेच्या पतीचा तीन महिन्यांपूर्वीच कॅन्सरने मृत्यू झाला. त्यानंतर अवघा १३ वर्षांचा मुलगाही गंभीर आजारी आहे. यामुळे नैराश्यातून महिलेने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
वानवडी येथील ३६ वर्षीय महिलेने आत्महत्या केली आहे. या महिलेचा १३ वर्षांच्या मुलगा किडनी व मधुमेह या आजारांनी ग्रस्त आहे. त्यामुळे त्याच्यावर रास्ता पेठेतील हॉस्पिटलच्या पाचव्या मजल्यावरील वॉर्ड क्रमांक सहा क्रमांकाच्या खोलीत उपचार सुरू होते. या खोलीच्या खिडकीला ग्रील नव्हते. या महिलेने सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास या खिडकीतून खाली उडी मारून आत्महत्या केली. महिला खाली पडल्यानंतर येथील सुरक्षारक्षकांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या महिलेच्या मुलावर याच विभागात उपचार सुरू असल्याचे समजले. या महिलेकडे सुसाईड नोट सापडली आहे. त्यामध्ये आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये, असे म्हटले आहे.
या महिलेच्या पतीचा तीन महिन्यांपूर्वी कॅन्सरच्या आजाराने मृत्यू झाला होता. तसेच, गेल्या चार वर्षांपासून त्यांचा मुलगा किडनी व मधुमेहाच्या आजाराने ग्रासलेला आहे. तो नियमित या हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी येत होता. या नैराश्यातूनच महिलेने आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.