फादर्स डेच्या पूर्व संध्येला पित्याचा खून
एका पाठोपाठ आत्महत्येची घटना किंवा हत्येची घटना घडत आहे फादर्स डेच्या पूर्व संध्येला लातुरातील चाकूर येथे मुलाने जन्मदात्या पित्याचा खून केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आज निलंगा तालुक्यात मुलाने बापाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे हे दोन्हीही खून जमिनीच्या वादातून झाले आहेत. एकापाठोपाठ एक घटना घडल्याने नागरिकांनाही धक्का बसला आहे.
निलंगा तालुक्यातील भोसलेवाडी या गावात पंचप्पा धुप्पाधुळे यांची वडिलोपार्जित शेत जमीन आहे. पावसाने चांगली साथ दिल्यामुळे त्यांनी पेरणी सुरू केली. या शेत जमिनीचा वाद आहे. त्याचा मुलगा नागनाथ यांचा वडिलांशी वाद होता. वडिलांनी पेरणी सुरू केली याचा राग त्याच्या मनात होता. या रागातून त्याचे वडिलांशी भांडण झालं. या वादात नागनाथ याची मुले बायको आणि मेव्हणे यांनीही साथ दिली. नागनाथ याने लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. यात पंचप्पा यांचा मृत्यू झाला आहे. हे भांडण सोडविण्यास गेलेल्या चार जणांना जबर मार बसला आहे. जखमींवर निलंगा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या बाबत निलंगा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेतील सर्व आरोपी फरार झाले असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.