आई गळफास घेत होती, ३ वर्षांची मुलगी रडू लागली अन्
नवी मुंबई: तीन वर्षांच्या मुलीमुळे तिच्या आईचा जीव वाचवण्यात पोलीस आणि अग्निशमन दलाला यश आले आहे. या तान्हुलीची आई गळफास घेऊन आत्महत्या करत होती. त्याचवेळी ही चिमुरडी जोरजोरात रडू लागली. हे ऐकून शेजारील लोक सतर्क झाले. त्यांनी पोलीस आणि अग्निशमन दलाला कळवले. तात्काळ घटनास्थळी पोहोचून पोलीस आणि अग्निशमन कर्मचाऱ्यांनी महिलेच्या गळ्यातील फास काढून तिला रुग्णालयात नेले आणि तिचा जीव वाचवला.
उलवे परिसरात ही घटना घडली. गुरुवारी रात्री उशिरा नवी मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाचा फोन खणाणला. एका फ्लॅटमधून लहान मुलगी जोरजोरात रडत असल्याचा आवाज येत आहे. नियंत्रण कक्षाकडून याबाबत एनआरआय सागरी पोलीस ठाण्यात सूचना गेली. तेथील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अग्निशमन दलालाही कळवले.
फ्लॅटचा दरवाजा आतून बंद होता. कदाचित मुलगी घरात एकटीच आहे आणि तिला काही दुखापत झाली असावी, असं सुरुवातीला काही लोकांना वाटलं. त्यांनी दरवाजा तोडला. एक चिमुरडी मोठमोठ्याने रडत होती. त्यांनी तिला उचलून घेतले. मात्र, ती बेडरूमकडे बघत जोरजोरात रडत होती. त्यामुळं काही तरी भयंकर घडलं असावं, असा अंदाज पोलिसांना आला. त्यांनी बेडरूमचा दरवाजा जोरात ढकलला मात्र, तो आतून बंद होता. त्यावेळी त्यांनी बेडरूमचा दरवाजा तोडला. त्यावेळी महिला पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसली. तिच्या गळ्यातील फास काढून तिला खाली उतरवलं. ती जिवंत असल्याचं लक्षात आल्यानंतर पोलीस आणि अग्निशमन कर्मचाऱ्यांनी तातडीने तिला रुग्णालयात नेलं. आता तिची प्रकृती बरी आहे. पोलिसांनी सांगितलं की, महिला तीन वर्षांच्या मुलीसह फ्लॅटमध्ये राहते. दुसऱ्या मजल्यावर त्यांचा फ्लॅट आहे. तिचा पती नोकरीनिमित्त बाहेरगावी असतो. या घटनेची माहिती त्याला दिली आहे. महिलेनं हे टोकाचे पाऊल का उचलले याचा तपास पोलीस करत आहेत.