आयुक्त तुकाराम मुंढे चिडून सभागृहाबाहेर पडले
नागपूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ
नागपूर : कोरोनामुळे तीन महिने लांबलेल्या नागपूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत जोरदार गदारोळ झाला. “तुम्ही सभागृह काय, नागपूर सोडून जा.” तसंच “संत तुकाराम यांच्यावरुन तुमचं नाव आहे, त्याला कलंकित करुन नका,” असं वक्तव्य भाजप नेत्यांनी केलं. भाजप नगरसेवकांच्या वक्तव्यावर महापालिका चिडलेले आयुक्त तुकाराम मुंढे सभागृहाबाहेर पडले.
सभागृहात काय घडलं?
सभागृहात पॉईंट ऑफ इन्फर्मेशनचा मुद्द्यावरुन आयुक्तच आक्रमक झाले. हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करत असताना भाजप आमदारांनी गोंधळाला सुरुवात केली. तुकाराम मुंढे बोलणं थांबवत नाहीत हे बघून भाजप नेते दयाशंकर तिवारी यांनी आवाज चढवला. जर नगरसेवक आवाज चढवणार असतील तर मी इथे बसणार नाही, असं तुकाराम मुंढे यांनी भर सभेत महापौरांना आणि सभेला सांगितलं. यानंतर तुम्ही सभागृह काय, नागपूर सोडून जा, असं वक्तव्य भाजप नेत्यांनी केल्यानंतर तुकाराम मुंढे नाराज झाले. त्यातच संत तुकारामांच्या नावावरुन तुमचे नाव आहे, त्याला तरी कलंकित करु नका, असं नगरसेवक हरीश ग्वालबांशी यांनी म्हटल्यानंतर तुकाराम मुंढे सभागृहातून बाहेर पडले.
काय आहे सर्वसाधारण सभेबद्दलचा वाद?
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन महिन्यांपासून महापालिकेची सर्वसाधारण सभा झालेली नव्हती. दर महिन्याला एकदा सर्वसाधारण सभा होणं अपेक्षित असताना महापौर संदीप जोशी यांनी सर्वपक्षीय गटनेत्यांसोबत चर्चा करुन 20 जून रोजी महापालिकेची सर्वसाधारण सभा बोलावली होती. परंतु महापालिकेची सभा ज्या ठिकाणी होणार तो टाऊन हॉल कोरोनाचं प्रतिबंधित क्षेत्र असल्याचा मुद्दा पुढे करत तिथे सभा घेता येणार नाही अशी भूमिका आयुक्त मुंढे यांनी मांडली. त्यानंतर सर्वपक्षीय गट नेत्यांनी महापालिकेच्या मालकीच्या आणि तब्ब्ल दोन हजार आसन क्षमता असलेल्या विशालकाय भट सभागृहात सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोना संदर्भातले सर्व नियम पळून सभा घेण्याचं ठरवलं होतं. त्यानंतर तुकाराम मुंढे यांनी अशी सभा घ्यावी की नाही याबद्दल राज्य शासनाचा अभिप्राय मागितला होता. त्यावर राज्य शासनाने अशी सभा घेण्यास हरकत नाही. सर्व महापलिकानी अशी सभा केव्हा आणि कोणत्या स्थितीत घ्यावी हे त्यांच्या पातळीवर ठरवावे असे सांगत फक्त सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळत सभा घेण्यास हरकत नसल्याचा अभिप्राय दिला. त्यानंतर तुकाराम मुंढे यांच्या भूमिकेला राज्य शासनाने एकाप्रकारे नाकारल्याचं सांगत भाजप नेत्यांनी त्यांच्यावर आरोप करण्यास सुरुवात केली आहे.