एसटी कंडक्टरचा मुलगा बनला डेप्युटी कलेक्टर
उस्मानाबाद : एखाद्या यशाला किंवा अपयशाला परिस्थिती कधीच जबाबदार नसते. परिस्थिती कितीही हलाखीची असो त्यावर मात करत यशाचे उत्तुंग एव्हरेस्ट शिखर सर करता येते. हे पुन्हा एकदा उस्मानाबाद मधील कळंब तालुक्यातील रविंद्र आपदेव शेळके यांनी दाखवून दिले आहे. काल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2019 निकाल जाहीर केला. यामध्ये कळंब तालुक्यातील बोर्डा या छोट्याशा गावातील गरीब कुटुंबातील रविंद्र शेळके यांनी मागासवर्गीय प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक पटकावत संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे.
रविंद्र शेळके यांनी 582 गुण मिळवत हे घवघवीत यश संपादन केले आहे. रविंद्र यांचे वडील एसटीमध्ये वाहक या पदावर कार्यरत होते. रविंद्र यांनी आपले वैद्यकीय शिक्षण मुंबईमधील सायन येथील लोकमान्य टिळक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे पूर्ण केले. पण त्यानंतर मात्र त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात जाण्याचा विचार बदलून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू करून एमपीएससीत नाव कमावण्याची स्वप्न रंगवायला सुरुवात केली. त्यादिशेने पाऊल टाकत त्यांनी 2018 च्या राज्यसेवा परीक्षेच्या मुलाखतीपर्यंत धडक मारली पण अपयशच हाती आलं.
पण अपयशाला कुरवाळत बसणार तो रविंद्र कुठला. त्यानं पुन्हा नव्या जोमाने अभ्यासाला सुरुवात करत आज अखेर उपजिल्हाधिकारी या पदाला गवसणी घालत स्पर्धा परीक्षेतील मुलांपुढे एक आदर्श निमार्ण केला आहे. या आधी रवींद्रनं केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. परंतु त्या परीक्षेमध्ये त्याला किरकोळ गुणाने हुलकावणी दिली. त्यानंतरही निराश न होता रवींद्रने आपला अभ्यास सुरू ठेवला होता.
रवींद्रनं सुरुवातीलाच डॉक्टर व्हायचं ठरवलं होते. डॉक्टर झालो तर वैद्यकीय सेवा बजावत असताना एका परिघात आपण अडकलोय असं सतत वाटत होतं. समाजातल्या विविध घटकांत काम करण्याची संधी मिळायला हवी, यासाठी आधी त्याने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली. रवींद्र त्यासाठी दिल्लीत एक वर्ष राहिला, काही परीक्षाही दिल्या. पण यश थोडक्यात हुलकावणी देत होतो.
त्याच्या घरची आर्थिक परिस्थितीही फारशी चांगली नाही. रवींद्र हा मूळचा कळंब तालुक्यातल्या बोर्डा इथला रहिवासी. रवींद्रचे वडील आपदेव हे कळंबच्या आगारातून बस वाहक म्हणून निवृत्त झाले. त्यांना श्रीकांत, प्रशांत आणि रवींद्र ही तीन मुलं. तीन मुलांचा खर्च निवृत्तीनंतर न मिळणारी पेन्शन यामुळे अखेर रवींद्रनं दिल्ली सोडली आणि तो महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीला लागला. राज्य लोकसेवा आयोगाची जाहिरात निघाल्यानंतर त्यासाठी अर्जही दाखल केला.
रोज दहा तास अभ्यास केला. अभ्यासात सातत्य ठेवलं. वडील आपदेव, आई पद्मिनी यांनी त्याला सतत पाठिंबा दिला. त्यामुळं अखेर यश मिळालंच. यासंदर्भात एबीपी माझाशी बोलताना रवींद्र शेळकेंनी सांगितलं की, आपण अधिकारी व्हायचं ठरवलं होतं. मधल्या काळात यशाने हुलकावणी दिली. परंतु त्यानंतरही निराश न होता सतत अभ्यास कायम ठेवला. राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा दिल्यानंतरच आपण चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होवू याची खात्री होती. निकाल ज्यावेळी जाहीर झाला, त्यावेळेला केवळ नंबरची उत्सुकता होती.
राज्यात सर्वसाधारण गटातून दुसरा क्रमांक आणि इतर आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय गटातून पहिला क्रमांक मिळवला, याबद्दल समाधान वाटतंय असं तो म्हणाला. यासंदर्भात रवींद्रचे वडील आपदेव शेळके यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आपल्या मुलाने राज्यात नावलौकिक मिळवला याचा कुटुंबाला आनंद आहे. यशाची खात्री होती, परंतु एवढं उत्तुंग यश रवींद्र मिळवेल असं वाटलं नव्हतं. त्याच्या यशामुळे गावाला आणि आम्हा सर्वांना आनंद झालाय.