Newsदेश विदेश

हत्यारांची वाहतूक करणारा ड्रोन पाडला

श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या कठुआ भागात सीमा सुरक्षा दलानं (BSF) एक पाकिस्तानी ड्रोन पाडला. या ड्रोनमधून ७ ग्रेनेड, यूएस मेड एम-४ रायफल, दोन मॅगझिन, ६० राऊंड गोळ्या जप्त करण्यात आली आहेत. हा ड्रोन आकारानं मोठा असल्याचंही दिसून येतंय. या ड्र्रोनमधून अली भाई नावाच्या व्यक्तीला या हत्यारांचा पुरवठा केला जात होता.

शनिवारी सकाळी ५.१० मिनिटांनी ही घटना घडल्याचं सांगण्यात येतंय. कठुआ जिल्ह्यातील पानसर भागात सीमा सुरक्षा दलाच्या जवानांच्या नजरेतून हा ड्रोन सुटू शकला नाही.

पानसर भागात आंतरराष्ट्रीय सीमेनजिकच्या चौकीजवळ (Bo) हेरगिरी करणारा हा ड्रोन आढळला. सीमा सुरक्षा दलाच्या कर्तव्य क्षेत्रात (Area of Responsibility – AOR) हा ड्रोन घिरट्या घालत होता.

सीमा सुरक्षा दलाचे सहाय्यक निरक्षक (SI, BSF) देवेंदर सिंह यांनी या ड्रोनवर ८ राऊंड फायर केले आणि ड्रोन जमिनीवर पाडला. २५० मीटरच्या भारतीय हद्दीत पडलेल्या या ड्रोनला ताब्यात घेण्यात आलं.

त्यानंतर ड्रोनची पडताळणी केल्यावर हेरगिरी आणि दहशतवादी हत्यारांच्या वाहतुकीसाठी हा ड्रोन वापरला जात असल्याचं समोर आलंय.

या ड्रोनच्या सहाय्यानं पाकिस्तानातून काश्मीरमध्ये हत्यारं पोहचवण्याचे प्रयत्न सुरू होते. परंतु, दक्ष भारतीय जवानांनी पाकिस्तानचे हे प्रयत्न हाणून पाडले.

या अगोदरही अनेकदा भारतीय सुरक्षा दलाकडून कुपवाडा, राजौरी आणि जम्मू सेक्टरमध्ये या पद्धतीच्या हत्यारांच्या तस्करीचा भांडाफोड करण्यात आलाय.

दरम्यान, अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ८.५० च्या सुमारास हिरानगर सेक्टरच्या बबिया चौकीवर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. आंतरराष्ट्रीय सीमेवर तैनात बीएसएफनं या गोळीबाराला प्रत्यूत्तर देणं टाळलं.

पाकिस्तानकडून जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये सक्रीय ठेवण्यासाठी पाकिस्तानकडून हत्यारांचा पुरवठा केला जातो. परंतु, एकीकडे लडाख भागात भारत चीन दरम्यान तणाव शिगेला पोहचला असताना दुसऱ्या बाजुनं पाकिस्तानकडूनही केल्या जाणाऱ्या दहशती कारवायांवर सुरक्षा दलाचं चोख लक्ष आहे.