अबब..! सात जणांनी केली वाघाची शिकार
दिवसेंदिवस वाघांची संख्या कमी होत असल्याने प्रशासनाने “SAVE THE TIGER!” असा नारा उंचावला आणि वाघांचे संरक्षण करण्याकरिता यंत्रणा हलवली पण अंधारी प्रकल्पाच्या सीमेवर चंद्रपूर वन विभागाचे अंतर्गत येत असलेल्या पिंपळखुट येथे एका वाघाचे हाड आणि इतर अवयव मिळाल्याने वन विभागात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वन विभागाने सात जणांना ताब्यात घेतले आहे. ताडोबातील तीन वाघांच्या हत्येचे प्रकरण चर्चेत असतांना गुरुवारी ही शिकारीची घटना समोर आली आहे.
वन विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चार वर्षांपूर्वी ताडोबा बफर क्षेत्रालगत वाघाची शिकार केली गेली. त्यानंतर मृतदेह एक खड्डा करुन गाडण्यात आला. या शिकारीचे बिंग फुटल्यानंतर गुरुवारी पुन्हा खड्डा खोदून वाघाची हाडे जप्त करण्यात आली आहेत. आतापर्यंत या प्रकरणी ७ जणांना ताब्यात घेतले आहे. चार वर्षांपूर्वी रानडुकरची शिकार करण्यासाठी अटकेत असलेल्या सात लोकांनी फास लावला होता. त्यात वाघ फसला आणि त्याचा मृत्यू झाला. तब्बल ४ वर्षांनी हे प्रकरण समोर आल्यामुळे खळबळ माजली आहे. वन विभागाने आरोपींकडून वाघाची नखे, हाडे व इतर साहित्य जप्त केलं आहे.