कोरोना योद्धांच्या मदतीला SMART WATCH!
17 जून : कोरोना रुग्णांची सेवा करणारे कित्येक डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. कोरोना रुग्णाच्या तपासणीसाठी त्यांना वारंवार रुग्णाच्या जवळ जावं लागतं. ज्यामुळे त्यांना कोरोनाव्हायरसची लागण होण्याचा धोका अधिक वाढतो. अशा परिस्थिती आता या कोरोना योद्धांच्या मदतीला येणार आहे ते स्मार्ट वॉच (SMART WATCH). ज्यामुळे रुग्णाच्या जवळ न जाताच त्याची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
आयआयटी हैदराबादच्या (IIT Hyderabad) विद्यार्थ्यांनी असं उपकरण तयार केलं आहे, जे एखाद्या घड्याळाप्रमाणे आहे. हे उपकरण रुग्णाच्या मनगटावर बांधल्यानंतर रुग्णाची संपूर्ण माहिती डॉक्टरांपर्यंत पोहोचेल. डॉक्टरांना रुग्णाजवळ जाण्याची गरज नाही. रुग्णापासून दूर राहूनही त्याच्यावर आणि त्याच्या आरोग्यावर लक्ष ठेवता येणार आहे.
नेमोकेअर रक्षा प्लस (Nemo care raksha plus) असं या उपकरणाचं नाव आहे. नेमोकेअर रक्षा प्लसमुळे डॉक्टरांना रुग्णाजवळ जाऊन स्वत: तपासणी न करता त्याच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी, हार्ट रेट, रेस्पिरेटरी रेट आणि शरीराचं तापमान याची माहिती मिळेल.
– दैनिक झुंजारनेता लाईव्ह,बीड