बीड

‘वृक्ष लागवड अन जोपासनेवर’ आत्ताच मेहनत घेऊ – आ विनायक मेटे

बीड (प्रतिनिधी):- जिल्ह्यातील दुष्काळ कायमस्वरूपी हटावा, पाण्याची मुबलकता असावी, हरित संपत्ती वाढावी यासाठी शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष आ विनायकराव मेटे हे सातत्याने आग्रही असतात. नुसताच आग्रह नव्हे तर ते त्यांच्या कृतीतून देखील उतरवण्याचे काम करतात. पाणी फाउंडेशन उपक्रमात गावोगावी जाऊन श्रमदान, आर्थिक मदत असो कि वृक्षलागवड व जोपासनेत पुढाकार आ मेटे यांनी सातत्याने यामध्ये युवा जोश दाखवला आहे. आपल्या कामाची प्रसिद्धी व्हावी यापेक्षा कामातून जास्तीत जास्त लोकांचा फायदा व्हावा हे धोरण आ मेटे यांनी ठेवलेले आहे. युवा शांती वन प्रोजेक्ट, श्री क्षेत्र नारायणगड येथील वृक्ष लागवड येथे वनाधिकारी व त्यासबंधी विभागांच्या लोकांना भेट घेत प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी करून आवश्यक त्या सूचना गेल्या आठवड्यात दिल्यानंतर काल आ मेटे यांनी श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथील वनउद्यान व नक्षत्र वनास भेट दिली. सोबतच आंबेसावळी रोडलगत ढेकणमोहा येथे असलेल्या डेन्स फॉरेस्ट व १३ कोटी वृक्ष लागवडीअंतर्गत असलेल्या वृक्षलागवडीस त्यांनी भेट दिली. जिल्ह्याच्या हरित भविष्यासाठी ‘वृक्ष लागवड अन जोपासनेवर’ आत्ताच मेहनत घेणे आवश्यक असून याबाबत कार्यक्षम अशी जनजागृती व कृती आवश्यक असल्याचे ते यावेळी म्हणाले.
   श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडीच्या पायथ्याशी अध्यात्माला निसर्गाची अवीट अशी सांगड घातली गेलेली आहे. याठिकाणी असलेल्या वन उद्यान, नक्षत्र वनास भेट देत आ मेटे यांनी वन अधिकारी – कर्मचाऱ्यांना काही आवश्यक सूचना केल्या. संगोपन व वृद्धीस निधीची आवश्यकता असेल तर तशी मागणी करण्याची देखील त्यांनी सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिली. या ठिकाणी परिसरात जखमी होणाऱ्या वन्यप्राण्यांना उपचारासाठी बनवण्यात आलेल्या ठिकाणाची पाहणी देखील आ मेटे यांनी केली. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नैसर्गिक परिसंस्था टिकणे आवश्यक असून आम्हा लोकप्रतिनिधींनी याबाबत पुढाकार घेणे आवश्यक असलयाचे ते यावेळी म्हणाले.
    गेल्या २ वर्षांपूर्वी पडलेल्या कडक दुष्काळात आंबेसावळी रोडलगत वनविभागाकडून ढेकणमोहा येथे लागवड व जोपासना करण्यात आलेल्या १३ कोटी वृक्षलागवड अभियानातील झाडांची पाहणी आ मेटे यांनी केली. यावेळी त्यांनी ५० हजारांपेक्षा अधिक झाडांना सशक्तपणे जोपासणाऱ्या वनमजूर पिंपळे व त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या वन अधिकाऱ्यांचे कौतुक केले. वन विभागात अशाप्रकारची कर्तव्याशी प्रामाणिक असलेले लोक कमी असून सर्वानीच त्यांचा आदर्श घ्यावा असेदेखील आ मेटे म्हणाले. सुमारे ३० हजार झाडांचे डेन्स फॉरेस्ट देखील रोडलगत २.५ हेक्टर क्षेत्रात बनवले गेल्याची पाहणी त्यांनी यावेळी केली. झाडे लावणे आवश्यकच असून त्यांची जोपासना करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. सध्या जिल्ह्यात आधीच वनक्षेत्र अगदीच नगण्य आहे त्यात आता किमान आहे ते तरी परिपूर्न असावे असे ते म्हणाले. यावेळी जिल्हाध्यक्ष सुधीर काकडे, बळीराम थापडे, धनंजय गुंदेकर, उल्हास घोरड, धर्मराज मसवले, वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी आदींची उपस्थिती होती. 

दैनिक झुंजारनेता लाईव्ह,बीड