बीड

21 जूनला भारतात कंकणाकृती सूर्यग्रहण; पुन्हा कित्येक वर्ष जुळून येणार नाही असा योग

नवी दिल्ली, 17 जून : ग्रहणाबाबत (eclipse) आपण शाळेत अभ्यास केलेलाच आहे, शिवाय दिनदर्शिकेतही याची माहिती दिलेली असते. घरातील मोठ्या व्यक्तींकडूनही ग्रहणाबाबत आपण ऐकलं आहे. त्यामुळे ग्रहणाबाबत थोडीफार माहिती आपणा सर्वांना असतेच. अनेकांना ग्रहण पाहण्याची इच्छा असतेस मात्र याची सर्वात जास्त उत्सुकता असते ती खगोलप्रेमींना आणि भारतातल्या खगोलप्रेमींसाठी सुवर्णसंधी आली आहे. 21 जूनला भारतात कंकणाकृती सूर्यग्रहण (annular solar eclipse) दिसणार आहे.

भारताच्या उत्तर भागात काही ठिकाणी राजस्थान, हरयाणा आणि उत्तराखंडमध्ये काही भागात सकाळी कंकणाकृती ग्रहण दिसेल. तर देशात इतर ठिकाणी खंडग्रास सूर्यग्रहण (partial solar eclipse) पाहता येईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 9 वाजून 16 मिनिटांनी ग्रहणाचे वेध सुरू होतील. 10 वाजून 19 मिनिटांनी कंकणाकृती ग्रहणाला सुरुवात होईल. कंकणाकृती ग्रहण दुपारी 2 वाजून 2 मिनिटांनी सुटेल तर खंडग्रास ग्रहण दुपारी 3 वाजून 4 मिनिटांनी सुटेल.

कंकणाकृती ग्रहण सुरू असताना भारतात सूर्याचा 98.6 % भाग चंद्रामुळे झाकला जाईल. डेहराडून, कुरुक्षेत्र, चामोली, जोशीमठ, सिरसा, सुरतगड अशा काही ठिकाणी कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे. तर मुंबई, दिल्लीत खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल. ग्रहणादरम्यान दिल्लीमध्ये सूर्याचा सुमारे 94% भाग, गुवाहाटीमध्ये 80 %, पाटणा येथे 78%,  सिलचर येथे 75%, कोलकाता येथे 66%, मुंबईमध्ये 62 टक्के, बंगळुरूमध्ये 37% , चेन्नई मध्ये 34 टक्के तर पोर्ट ब्लेअर येथे 28% भाग चंद्रामुळे झाकला जाणार आहे.

महाराष्ट्रात कुठे कोणत्या वेळी सूर्यग्रहण

ठिकाण      ग्रहणाला सुरुवात            सर्वोच्च ग्रहण स्थिती        सूर्याचा झाकला जाणारा भाग           ग्रहणाचा शेवट

मुंबई           10 वाजता                      11 वाजून 37 मिनिटं                 62.1 टक्के                     13 वाजून 27 मिनिटं

नागपूर        10 वाजून 17  मिनिटं      12 वाजून 01 मिनिट                 63.7 टक्के                     13 वाजून 50 मिनिटं

नाशिक       10 वाजून 03  मिनिटं      11 वाजून 42 मिनिटं                64.8 टक्के                      13 वाजून 32 मिनिटं

पुणे             10 वाजून 03  मिनिटं       11 वाजून 40 मिनिटं               59.5 टक्के                       13 वाजून 30 मिनिटं

सूर्यग्रहण म्हणजे काय?

सूर्यग्रहण अमावस्येच्या दिवशी दिसते, जेव्हा चंद्र, पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो आणि तिघेही एका सरळ रेषेत असतात. जेव्हा चंद्र पृथ्वीपासून त्याच्या सर्वाधिक लांब अंतरावर राहून सूर्य आणि पृथ्वीच्यामध्ये येऊन सूर्याला झाकतो, मात्र लहान आकारामुळे तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही, तेव्हा कंकणाकृती सूर्यग्रहण दिसते. अशा वेळी चंद्र सूर्याच्या मध्यभागी दिसतो आणि सूर्याच्या बाह्याकाराचे कंकण दिसू लागते. एका वर्षात संपूर्ण पृथ्वीवरून किमान दोन ते पाचवेळा सूर्यग्रहणं पाहता येतात. त्यातलं एखाद-दुसरंच खग्रास ग्रहण असतं, तेदेखील सगळ्याच देशांतून दिसत नाही. कंकणाकृती ग्रहण दिसणं त्यापेक्षाही दुर्मिळ. चंद्राच्या थेट छायेखाली असलेल्या प्रदेशातच कंकणाकृती ग्रहण दिसतं. तर त्याच्या आसपासच्या प्रदेशात खंडग्रास ग्रहण पाहायला मिळतं. भारतातून याआधी 15 जानेवारी 2010 रोजी आणि त्यानंतर दहा वर्षांनी 29 डिसेंबर 2019 रोजी कंकणाकृती ग्रहण दिसलं. आता ते 21 जून 2020 रोजी उत्तर भारतातून दिसणार आहे. त्यानंतर पुढची अनेक वर्षे भारतातून कंकणाकृती ग्रहण दिसणार नाही.

सूर्यग्रहण सुरक्षितपणे कसे पाहावे?

कंकणाकृती सूर्यग्रहण हे जेव्हा चंद्र पृथ्वीपासून त्याच्या सर्वाधिक लांब अंतरावर राहून सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येऊन सूर्याच्या प्रकाशाला झाकून टाकतो तेव्हा कंकणाकृती सूर्यग्रहण दिसते. या सूर्यग्रहणात चंद्र जास्त अंतरावर असल्यामुळे तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही. अशावेळी सूर्याची वर्तुळाकार कडी चंद्राच्या पाठीमागे दिसते. त्यामुळं सूर्यग्रहण पाहण्यासाठी कायम सुरक्षित पद्धतींचाच वापर करावा.

सूर्याकडून येणाऱ्या प्रखर आणि अतिनील किरणांमुळे (अल्ट्रा व्हायोलेट) डोळ्यांना इजा होऊ नये म्हणून ग्रहण उघड्या डोळयांनी पाहू नये. यासाठी बाजारात मायलर फिल्मपासून तयार करण्यात आलेले चष्मे वापरावे. यांची किंमत रुपये 200पासून असते. सध्या बाजारात काही बनावटही चष्मे मिळतात. त्यामुळं नीट तपासून हे चष्मे खरेदी करावेत. त्याचबरोबर घरात जर वेल्डिंगसाठी वापरण्यात येणारी काच असेल तर या काचेचा वापर करूनही तुम्ही कंकणाकृती सूर्यग्रहण पाहू शकता.

काय असतात ग्रहणाबाबत अंधश्रद्धा?

सूर्यग्रहण, चंद्रग्रहण आले की काळजाचा ठोका चुकतो, तो गरोदर मातांचा. भाजी चिरली की गर्भाचे ओठ फाटणार, बोटे जुळविली तर गर्भाची बोटे जुळणार, पापण्या मिटविल्या तर डोळ्यात व्यंग येणार अशा अनेक अंधश्रद्धांचे काहूर माजते. त्याचबरोबर ग्रहणात मंदिरांचे दरवाजेही बंद ठेवण्यात येतात. एवढेच ग्रहण पाहायचे नाही, जेवायचे नाही अशाही काही अंधश्रद्धा आहेत. मात्र हा नैसर्गिक आविष्कार असल्यामुळं या अंधश्रध्दांवर विश्वास न ठेवता, या विलोभनीय खेळाचा आनंद घ्या.