News

बीड जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामासाठी पिक विमा कंपनीची नियुक्ती करा – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

बीड -:- बीड जिल्ह्यातील खरीप आणि रब्बी हंगामात पिकांसाठी पिक विमा भरणे गरजेचे असून यासाठी विमा कंपनीची नियुक्ती करणे महत्वाचे असून विमा कंपनीची नियुक्ती झाल्यास शेतकर्‍यांना फायदा होईल अशी मागणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. बीड जिल्ह्यासह खरीप व रब्बी हंगामातील पिकांचा विमा शेतकर्‍यांना भरण्यासाठी पिक विमा कंपनीची नियुक्ती करण्यात यावी. गेल्या वर्षी खरीप हंगामासाठी पिक विमा स्विकारण्यात आला त्यानंतर रब्बी हंगामासाठी बीड जिल्ह्यासह इतर जिल्हा समूहाकरता अल्प मुदतीची ई-निवीदा प्रसिध्द करण्यात आली होती त्यास कोणताही प्रतिसाद प्राप्त झाला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या वर्षी बीड जिल्ह्यात साडे आठ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी होणार आहे असा कृषि विभागाचा अंदाज असून यामध्ये कापूस, सोयाबीन, तूर, मुग, उडीद, मका या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात होते. बीड जिल्ह्यात सातत्याने पावसाचे प्रमाण अनियमित असून कधी दुष्काळी परिस्थिती तर कधी गारपीठ तसेच अतिवृष्टी देखील होते. असे निसर्गाचे कालचक्र सुरू आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. याकरीता पिक विमा भरणे शेतकर्‍यांसाठी आवश्यक आहे तसेच या वर्षी रब्बी हंगामातही चार लाख हेक्टरवर रब्बी पिकाची पेरणी होऊ शकते. यासाठी देखील शेतकर्‍यांना पिकांचा विमा भरणे आवश्यक आहे. वरील दोन्ही हंगामातील पिकांना संरक्षण मिळण्यासाठी व शेतकर्‍यांच्या हितासाठी पिक विमा भरणे आवश्यक आहे. यासाठी बीड जिल्ह्यात पिक विमा कंपनीची बीड जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यातही पिक विमा कंपनीची नियुक्ती तातडीने करावी अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केली आहे.