बीड

गेवराई-विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू

गेवराई, दि. १५ आपल्या दुकानाचे शटर उघडत असताना अचानक विद्युत प्रवाह शटर मध्ये उतरून विजेचा जोरदार धक्का लागल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गेवराई शहरांमधील ताकडगाव रोडवर असलेल्या दीपक हेअर सलून मध्ये घडली असल्याची माहिती आमचे पत्रकार सुभाष मुळे यांनी दिली.
याविषयी सविस्तर माहिती अशी की, गेवराई शहरातील ताकडगाव रोडवर असलेल्या दीपक हेअर सलून चे मालक दीपक दादासाहेब छेडेदार ( वय २१ ) राहणार खळेगाव हल्ली मुक्काम गेवराई हा आज दुपारी पाऊस आलेला असताना पाऊस थांबल्यानंतर त्याने आपल्या दुकानाचे शटर उघडत असताना विजेचा प्रवाह दुकानाच्या शटर मध्ये उतरला. शटर वर करत असताना दीपकला जोरदार विजेचा धक्का लागून तो जागीच कोसळला. त्याला आजूबाजूच्या व्यापाऱ्यांनी तात्काळ शासकीय उपजिल्हा रुग्णालयांमध्ये दाखल केले परंतु डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. अत्यंत मनमिळाऊ स्वभाव असणाऱ्या दीपक च्या अश्या अकाली जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे
– दै.झुंजारनेता लाईव्ह,बीड

( सुभाष मुळे )