अन… महाराज झाले मराठवाड्याचे अध्यक्ष!
बीड- गल्लीत गोंधळ… दिल्लीत मुजरा..! या चित्रपटातील महाराजांच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेले गेवराई तालुक्याचे भूमिपुत्र, मराठी चित्रपट सृष्टी मध्ये अनेक यशस्वी भूमिका साकारणारे सिनेकलावंत, लेखक, दिग्दर्शक, कवी अशा विविध क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून नावलौकिक प्राप्त करणारे डॉ. सुधीर निकम यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्या मराठवाडा विभाग अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.
बीड जिल्ह्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात सुधीरजींचं अतुलनीय योगदान आहे.सांस्कृतिक क्षेत्रात अवघ्या बीड जिल्ह्याला अभिमान वाटावा असं कार्य डॉ. सुधीरजी निकम यांनी सातत्याने केले आहे.नाट्यलेखन,नाट्य दिग्दर्शनाच्या माध्यमातून मराठवाड्यासह राज्यस्तरावर त्यांची एक वेगळी छाप आहे.सुधीरजींच्या धुमस,उचल,लिंपण अशा वेगळ्या आशयाच्या एकांकीने एक काळ गावाला आहे,सुधीरजींनी राज्यातील दर्जेदार स्पर्धेतून तसेच विविध महाकरंडकातून विजयाचे मानकरी ठरत अनेक शहरातील,जिल्हयातील,ग्रामीण भागातील अनेक कलावंत घडविले आहेत.मराठवाड्याच्या या तळमळीच्या कलावंताने निश्चितपणे सर्व सामान्य माणसाच्या वेदनेचे प्रतिबिंब सातत्याने पडद्यावर आणले आहे.यामुळे अनेक नामवंत एकांकिका स्पर्ध्येतून सुधीरजींना विविध पुरस्काराने सन्मानित केलेले आहे.
आज सुधीरजींची नाट्यक्षेत्रातून सिनेसृष्टीतही दमदार वाटचाल सुरु आहे.मराठी रंगभूमीतील अनेक जेष्ठ ,श्रेष्ठ अभिनेत्यासोबत सुधीरजींनी अनेक यशस्वी भूमिका साकारलेल्या आहेत.विविध चित्रपटाच्या कथा -पटकथा,लघुपट व दिग्दर्शनसह मोलाची कामगिरी मुंबईच्या मायावी नगरीत ते बजवात आहेत.अशा प्रतिभावंत कलावंतांकडे मराठवाड्याच्या अध्यक्षपदाची जिम्मेदारी सोपवणे हा निश्चितच डॉ. सुधीरजींचा सन्मान आहे.
उमद्या व नेतृत्वशील जेष्ठ कलावंतास मराठवाड्याच्या अध्यक्षपदाचे पद मिळाल्याने मराठवाड्याच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून मराठवाड्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात मरगळ झटकून आता पुन्हा नव्याने काहीतरी नवं निर्मिती होईल अश्या कलावंतांमध्ये आशा पल्लवित झाल्या आहे.
– दै.झुंजारनेता लाईव्ह,बीड