फी भरण्यासाठी शाळेकडूनच कर्जाची सोय
कोरोनाच्या संकटात महाराष्ट्रातील अनेक शाळा फीसाठी तगादा लावत असल्याच्या तक्रारी आपण ऐकल्या असतील. पण आता औरंगाबादेतील गुरुकुल शाळेने फी भरण्यासाठी कर्ज उपलब्ध करुन दिले आहे आणि याचं व्याज शाळा भरण्यास तयार आहे. यापूर्वी उच्च शिक्षणासाठी बँका कर्ज देत असल्याचं तुमच्या ऐकीवात असेल. मात्र आता गुजरातस्थित एका फायनान्स कंपनीने शाळेची फी भरण्यासाठी कर्ज देण्याची तयारी दर्शवली आहे.
औरंगाबादच्या गादीयाविहार शहानूर मिया दर्ग्याजवळ गुरुकुल इंग्लिश माध्यमाची शाळा आहे. या शाळेने कोरोनाचे संकट पाहता पालकांसाठी शाळेची फी भरण्यासाठी कर्ज उपलब्ध करुन दिले आहे. या शाळेत गुजरातमध्ये असलेल्या नावाच्या फायनान्स कंपनीकडून हे कर्ज उपलब्ध करुन दिले आणि शाळा कर्जावरील व्याज भरायला तयार झाली आहे.
या कर्ज योजनेविषयी बोलताना या शाळेचे संस्थाचालक डॉ.सतीश तांबे सांगतात की, “सध्या कोरोनाच्या संकटात अनेक पालकांसमोर शाळेची फी कशी भरायची हा प्रश्न आहे. तर आमच्यासमोरही शाळेचे चक्र चालू ठेवायचं हाही प्रश्न होताच. विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावे म्हणून आम्ही महाराष्ट्राच्या बाहेरुन शिक्षकांना बोलावलं आहे. त्यांचा महिन्याकाठीचा पगार द्यावा लागतो, शाळेचं भाडेही भरावं लागतं. हे सर्व काही पालक फी भरतात त्यावर अवलंबून असतं. एरव्ही पालक तीन टप्प्यात फी भरायचे. त्यातही सुविधा मिळावी म्हणून आता महिन्याकाठी फी भरता यावी यासाठी या फायनान्स कंपनीकडून पालकांना कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या कर्जावरील व्याज आम्ही भरणार आहोत त्यामुळे पालकांना अधिकचा आर्थिक भुर्दंड बसणार नाही.”