News

प्रेक्षक व नाट्यकर्मीच्या सुरक्षेची काळजी घेऊनच महाराष्ट्रातील नाट्यगृहांचे “पडदे” उघडणार!

मुंबई – नाट्यगृह चालू करण्यासंबंधी, रसिक प्रेक्षक व नाट्यकर्मी यांची काळजी तसेच रंगभूमीच्या दृष्टिकोनातून उपस्थित होणारे अनेक मुद्दे यावर सविस्तर चर्चा व्हावी या उद्देशाने ज्येष्ठ दिग्दर्शक श्री.विजय केंकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई मराठी व्यावसायिक संघाच्या निर्मात्यांची बैठक अलीकडेच “झूम ऍप” द्वारे संपन्न झाली. या बैठकीत २२ नाट्य निर्मात्यांनी आपली मते मांडली.

याबैठकीत सुरुवातीसच श्री.विजय केंकरे यांनी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने गरजू नाट्यकर्मीना केलेल्या १ कोटी २० लाखांची केलेली मदत याबद्दल आभार मानले तसेच करोना विषाणूंचा नाट्य व्यवसायावर झालेला परिणाम, नाट्य निर्मात्यांपुढे आज जी आर्थिक ओढाताण निर्माण झालीय, त्यातून थोडा दिलासा मिळावा, यासाठी ‘मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघ,मुंबई’ने आपल्या २८ सदस्यांना नुकतेच प्रत्येकी ५०हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले आहे. उर्वरित गरजू सदस्यांनाही अशाप्रकारे अर्थसहाय्य देण्यात येईल,अशी माहिती प्रमुख कार्यवाह राहुल भंडारे यांनी यावेळी दिली.

राज्यातील नाट्यगृह आणि नाट्य प्रयोग सुरू करण्यापूर्वी करावयाच्या उपाय योजना, नाट्य व्यवसायापुढच्या अडचणी लक्षात घेऊन, त्या टाळण्यासाठी ठराव एकमताने मंजूर करून पुढील निर्णय घेण्यात आले.

१) महाराष्ट्रातील नाट्यगृहातील कोविड 19 च्या महामारीमुळे थांबलेले नाटकांचे प्रयोग “मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघ” आणि “अखिल भारतीय मराठी नाटय परिषदे”च्या परवानगीशिवाय सुरु करता येणार नाही. तसेच, या दोन्ही संस्थांच्या परवानगी पत्राशिवाय कोणत्याही नाट्यगृहाच्या तारखा नाट्य निर्मात्यांना दिल्या जाणार नाहीत.

२) नाटक सुरु करण्याआधी येणारा प्रेक्षक वर्ग, तंत्रज्ञ आणि कलाकार त्यांच्या करोना आजाराच्या संदर्भात त्यांच्या शारीरिक उपाययोजना काय असतील आणि त्या काय असायला पाहिजेत, (उदा. नाट्यगृहातील ‘एसी ब्लोअर’पासून उद्भवणारा धोका. 65 वर्षावरील कलाकार यांना काम करण्यास बंदी.) यावर मान्यवरांचा सल्ला घेऊनच नाट्यगृहात प्रयोग सादर करावेत.

३) सध्या नवीन प्रकार आलेल्या “ओटीटी प्लॅटफॉर्म”मधे दिनांक १० जून २०२० नंतर कुठल्याही निर्मात्याने नवीन नाटक देऊ नये. (कारण ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’ नाट्य व्यवसायासाठी नुकसानकारी आहे.)

हे निर्णय नाट्य व्यवसायाच्या हिताचे असल्याने, त्यांचे पालन नाट्य निर्मात्याप्रमाणेच नाट्यगृहाशी संबंधित सर्व शासकीय व सामाजिक संस्थांनी काटेकोरपणे करावे, असे आवाहन ‘मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघा’तर्फे जाहीर करीत आहोत, असे प्रमुख कार्यवाह राहुल भंडारे यांनी संगितले.

नाट्य संघटनांचा एकमुखी निर्णय
‘पुन:श्च हरि ओम’ म्हणत सज्ज होऊ पाहणाऱ्या नाट्य व्यवसायाच्या कल्याणकारी निर्णयाच्या ठरावांना ‘रंगमंच कामगार संघटना-मुंबई व पुणे, कलाकार संघ-मुंबई, व्यवस्थापक संघ- मुंबई; तसेच मुंबई-पुणेसह उर्वरित महाराष्ट्र नाट्यगृह व्यवस्थापन, यांच्या सहमतीनेच सादर करण्यात आलेत.

या निर्णयाचे ठराव महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंत्री, महानगरपालिका आयुक्त-मुंबई व पुणे; तसेच उर्वरित महाराष्ट्रातील नाट्यगृह संबंधित शासकीय प्रमुख अधिकारी यांना पाठवण्यात आले आहेत.

वरील निर्णय-ठरावांचे कोणीही पालन न केल्यास संबंधित संस्थांना निर्माता संघ,मुंबई. रंगमंच कामगार संघटना-मुंबई, कलाकार संघ- मुंबई, व्यवस्थापक संघ- मुंबई यांच्याकडून सादरीकरणासाठी (नाट्य प्रयोग, वाद्यवृंद, खाजगी कार्यक्रम) कोणतेही सहकार्य मिळू शकणार नाही.

यासाठीच्या अंमलबजावणीची एकवाक्यता नाट्य व्यवसायासंबंधित सर्व संघटनांची शिखर संस्था असलेल्या ‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद’चे अध्यक्ष नवनाथ (प्रसाद) मच्छिन्द्र कांबळी यांच्याशी सल्लामसलत करून ठरविण्यात आली आहे.