Popular News

सुशांत आत्महत्या प्रकरणाची अशी होणार चौकशी

14 जून : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या अकाली जाण्याने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. तरूण आणि हरहुन्नरी सुशांतने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं, असा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण झाला आहे. आत्महत्येची माहिती मिळतचा मुंबई पोलिसांनी सुशांतच्या घरी धाव घेतली. त्यानंतर सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी वेगाने तपास सुरू करण्यात आला आहे.

सुशांत सिंह राजपूत याला रात्री 2 वाजता त्याच्या घरातील नोकराने शेवटचा ज्यूस दिला होता. त्यानंतर थेट आज दुपारी सुशांतचं जेवण घेऊन नोकर गेला. मात्र बराच वेळ आवाज दिल्यानंतरही सुशांतने दार उघडलं नाही. त्यानंतर घरात असणाऱ्या सुशांतच्या मित्रांच्या मदतीने दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र भरपूर प्रयत्न करून दरवाजा तोडण्यात यश आलं नाही.

दरवाजा न तुटल्याने अखेर सुशांतच्या मॅनेजरने एका चावीवाल्याला बोलावून घेतलं. त्यानंतर दरवाजा उघडण्यात आला. मात्र समोर दिसला तो सुशांतचा मृतदेह. हे दृश्य बघून सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. पोलिसांना फोन करण्यात आला आणि काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सदर चावीवाल्याचा जबाब नोंदवून घेतला आहे.सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या करताना कोणतीही सुसाईड नोट लिहून ठेवली नव्हती. त्यामुळे त्याच्या आत्महत्येमागील कारण शोधण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे. आत्महत्या प्रकरणातील गुढ लवकरात लवकर उकलण्याचा पोलिसांचा प्रयत्न असेल. यासाठी पोलिसांकडून कॉल डेटा रेकॉर्डिंगची मदत घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. सुशांत सिंहला मागील काही दिवसांपासून येत असलेले कॉल आणि त्यावरील संभाषण याच्या आधारे काही धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे.