बीड

पगार सुरू न झाल्याने शिक्षकाची आत्महत्या

जालना (प्रतिनिधी) ः जालना जिल्ह्यामध्ये कामगारांना न्याय मिळवून देणारे कामगार नेते अण्णा सावंत यांनी एकनाथ सोळुंके या शिक्षकांचा पगार सुरू न केल्यामुळे या शिक्षकाने अण्णा सवंत व संस्थेच्या त्रासाला वैतागुन आत्महत्या केल्याची तक्रार सिमा सोळंके यांनी आष्टी पोलीस स्टेशन येथे केली आहे.याबाबत दिलेल्या तक्रारीत म्हटले की, शहीद भगतसिंग हायस्कुलमध्ये गेल्या आठ वर्षापासून नोकरी करूनही पगार सुरू होत नसल्यामुळे एकनाथ बाबासाहेब सोळुंके रा. कर्‍हाळा ता. परतुर या शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना परतूर तालुक्यातील कर्‍हाळा येथे घडली आहे. सदरील प्रकरणामध्ये कामगार नेते अण्णा सावंत व मुख्याध्यापकासह तीन जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मयताची पत्नी सिमा सोळुंके यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, एकनाथ सोळुंके हे फेब्रुवारी 2013 पासून जालना तालुक्यातील दरेगाव येथील शहीद भगतसिंग हायस्कुलमध्ये सहशिक्षक म्हणून कार्यरत होते. नोकरीला लागण्यासाठी त्यांनी अण्णा सावंत व मुख्याध्यापकासह अन्य दोघांना तीन टप्प्यात 15 लाख रुपये दिले होते. परंतु आठ वर्षे नौकरी करूनही पगार चालू न झाल्याने सोळुंके चिंतेत होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा या विवंचनेत सोळंके अतिशय त्रस्त झाले होते. त्यात संस्थाचालकांनी त्यांना आणखी पैशाची मागणी करून वारंवार मानसिक त्रास दिल्याने व संस्थेच्या दडपणाखाली येऊन त्यांनी कर्‍हाळा ता. परतुर येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत सिमा सोळंके यांनी लेखी तक्रार दिल्याने शाळेचे मुख्याध्यापक वसंत घुले,  कोषाध्यक्ष अण्णा सावंत, सचिव दामोधर मानकापे यांच्याविरुद्ध आष्टी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय पठाडे, महिला पोलीस कर्मचारी एस. एल. कांदे, जे. डी. शुक्रे व चौकशी पथक तपास करीत असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.