कोरोनाची नवी लक्षणे!
3 जून: मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबई तर कोरोनाचा हॉटस्पॉट झाला आहे. त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. सर्दी, ताप, खोकला, श्वास घेतांना त्रास होणे, अशक्तपणा ही कोरोनाची सर्वसाधारण लक्षणे आहेत. अशी लक्षणे आढळली तर तातडीने डॉक्टरांकडे जायचा सल्ला दिला जातो. नंतर तोंडाची चव जाणे आणि कुठलाही वास यायचा बंद होतो अशीही लक्षणे आढळली होती. आता मुंबईतल्या अनेक रुग्णांना गॅस्ट्रोसारखी लक्षणेही आढळून आल्याचं पुढे आलं आहे.
पावसाला सुरुवात झाली की दरवर्षी साथीचे आजारही डोके वर काढत असतात. सर्दी, खोकला, ताप, हे कॉमन आजार आहेत. त्यात गॅस्ट्रो आणि डेंग्युची साथही येत असते. अशा परिस्थितीत आता कोरोनाही आल्याने जास्त काळजी घेणे गरजेचे आहे.
कोरोना झालेल्या अनेक रुग्णांना पोट बिघडणं, थकवा येणं अशीही लक्षणं दिसून येत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. त्यामुळे निष्काळजीपणा न करता अशी काही लक्षणे आढळली तर तातडीने डॉक्टरांना दाखवा असा सल्लाही दिला जातोय.